World Cup 2019 : भारताचा दणक्यात विजय; अव्वल स्थानावर कब्जा

World Cup 2019 : भारताचा दणक्यात विजय; अव्वल स्थानावर कब्जा

वर्ल्ड कप 2019 : लीड्स : अॅंजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या आधाराने श्रीलंकेने कष्टाने उभारलेल्या 7 बाद 264 धावांचा रोहित शर्मा आणि लोकाश राहुलने शतके ठोकून झपाट्याने फडशा पाडला. रोहित शर्माने स्पर्धेतील विक्रमी पाचवे आणि तिसर्‍या सामन्यातील सलग तिसरे शतक ठोकले. रोहित शर्मा - लोकेश राहुलनी मिळून रचलेल्या 189 धावांची भागीदारी भारताला 44 व्या षटकात 7 फलंदाज बाकी राखून सहजी विजयी करून गेली.  

सामन्याच्या दिवशी सकाळी लीडस् शहरावर काळे ढग दाटून आले होते. सामना चालू होताना मात्र ढग सरकले आणि मस्त सूर्यप्रकाश पडला. नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेत आला आणि करुणारत्ने त्याला अपवाद नव्हता. भारतीय संघात विराटने दोन बदल केले. युझवेंद्र चहल आणि शमीला विश्रांती दिली गेली तेव्हा जडेजा आणि कुलदीप यादवला जागा मिळाली. 

जसप्रीत बुमराने सलामीच्या फलंदाजांना जास्तकाळ टिकून दिले नाही. बुमराच्या टप्पा पडून बाहेर जाणार्‍या चेंडूवर दोघे फलंदाज धोनीकडे झेल देऊन तंबूत परतले. करुणारत्नेचा झेल त्यामानाने सरळ होता आणि परेराचा थोडा कठीण होता. धोनी तिथे थांबला नाही त्याने पुढील दोन विकेटस्मधे हातभार लावला. मेंडिसला जडेजाच्या गोलंदाजीवर स्टंपिंग केल्यावर धोनीने हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर अविष्का फर्नांडोचा चांगला झेल पकडला. 

चार प्रमुख फलंदाज तंबूत परतले असताना फलकावर फक्त 55 धावा लागल्या होत्या. संघ अडचणीत सापडला होता तेव्हा अँजेलो मॅथ्यूज मदतीला धावून आला. जडेजाच्या गोलंदाजीवर भुवनेश्वर कुमारने सोडलेल्या कठीण झेलाचा भाग सोडला तर मॅथ्यूजने गोलंदाजांना संधी दिली नाही. अर्धशतक करून खेळणार्‍या थिरमानेला कुलदीप यादवने बाद करून 124 धावांची भागीदारी तोडली. 

मॅथ्यूजने 60 धावा झाल्यावर मोठे फटके मारणे चालू केले. दोन लांब लांब षटकार मारल्यावर हार्दिक पंड्याला चौकार मारून मॅथ्यूजने शतक पूर्ण केले. शतकानंतरही मॅथ्यूजने गरज ओळखून खेळी पुढे चालू ठेवली. 50 षटकांच्या अखेरीला श्रीलंकेने 7 बाद 264 धावा उभारल्या होत्या. भारतीय गोलंदाजीत दरारा जसप्रीत बुमराचा राहिला. 10 षटकात 37 धावा देत बुमराने 3 फलंदाजांना बाद केले. त्याच्या उलट भुवनेश्वर कुमारला 73 धावांचा मार पडला. 

धावांचा पाठलाग चालू केल्यावर रोहित शर्माने मागच्या सामन्यातील खेळी जणू पुढे चालू केली. आत्मविश्वास वाढलेल्या लोकेश राहुलनेही सकारात्मक फलंदाजी केली. मदत न करणार्‍या खेळपट्टीवर लसिथ मलिंगाची जादू चालली नाही तिथे बाकीच्या गोलंदाजांचे काय होणार. रोहित शर्मा आणि राहुलने मिळून झकास फलंदाजी करत सगळ्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. अर्थात रोहित शर्माचे अर्धशतक अगोदर पार पडले पण लोकेश राहुल जास्त मागे पडला नाही. 

92 चेंडूत रोहितने स्पर्धेतील पाचवे विश्वविक्रमी शतक पूर्ण केले आणि प्रेक्षक रोहितच्या नावाचा जयजयकार करू लागले. एकाच विश्वचषक स्पर्धेत पाच शतके करणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला. शतक करून रोहित 103 धावांवर बाद झाला. पहिल्या काही सामन्यात चांगली खेळी पण अर्धवट धावा करणार्‍या राहुलने रोहितकडून प्रेरणा घेत विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या शतकाची नोंद केली. राहुल 111 धावा करून मलिंगाला बाद झाला. विराट कोहलीने भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com