INDvsSA : आफ्रिका पूर्ण दबावाखाली; उमेश, शमीचा धडाका

ज्ञानेश भुरे
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला भारताने अपेक्षित सुरुवात केली. दुसऱ्या दिवस अखेरीस नाबाद असणारी थेऊनिस डी ब्रुईन आणि अॅन्रिच नॉर्टे ही जोडी परतविण्यात त्यांना यश आले आहे.

पुणे : दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला भारताने अपेक्षित सुरुवात केली. दुसऱ्या दिवस अखेरीस नाबाद असणारी थेऊनिस डी ब्रुईन आणि अॅन्रिच नॉर्टे ही जोडी परतविण्यात त्यांना यश आले आहे.

भारतातील खेळपट्ट्या बोअरींग; हा तर धडधडीत आरोप करतोय

सकाळच्या तासाभराच्या हवामानाचा भारतीय गोलंदाजांनी अचूक फायदा उठवला असे म्हणायला नक्कीच हरकत नाही. शमीने खेळपट्टीकडून मिळणाऱ्या बाऊन्सचा चांगला उपयोग करून घेतला, तर दुसऱ्या बाजूने उमेश यादवचे चेंडू चांगले स्विंग झाले नाहीत, पण त्याने राखलेला टप्पा आणि दिशा कमालीची होती. या दोन्हीचा फायदा या दोघांना मिळाला. 

शमीचा एक उसळलेला चेंडू सोडायचा की खेळायच्या या नादात नॉर्टे अडकला. बॅटची कड घेतली आणि उडालेला झेल चौथ्या स्लिपमध्ये कर्णधार कोहलीने छान टिपला. त्यानंतर उमेशच्या एका सरळ आलेल्या चेंडूवर कव्हरला खेळण्याच्या नादात ब्रुईन चकला. चेंडूने बॅटची कड घेतली. पहिल्या स्लिपमध्ये जाणारा झेल यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने उजवीकडे झेपावत सुरेख टिपला. 

तासाभराच्या या खेळात दक्षिण आफ्रिका नक्कीच दडपणाखाली राहिले यात शंका नाही. आता कर्णधार डू प्लेसी आणि डी कॉक ही जोडी दक्षिण आफ्रिका संघाला किती मोठी भागीदारी देते यावर त्यांचा सामन्यातील टिकाव अवलंबून राहिल. अर्थात पहिल्यया तासाभराच्या खेळानंतर भारतीय गोलंदाज ड्रायव्हिंग सीटवर आहेत यात शंका नाही.

संघातून हाकलंल होतं तरी शेवटी ब्रेक थ्यू त्यानंच मिळवून दिला ना!

दरम्यान, भारतीय क्षेत्ररक्षकांनी आज घेतलेले दोन्ही झेल हे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक श्रीधर यांनी घेतलेल्या परिश्रमाचे फलित होते. सराव सत्रात श्रीधर यांनी भारतीय क्षेत्ररक्षकांना फलंदाजांच्या जवळील भागात झेल घेण्याचा सराव दिला होता. या सत्रात मिळालेल्या टिप्स या नक्कीच भारतीय क्षेत्ररक्षकांसाठी महत्वाच्या ठरल्या.

उर्वरित दिवसभराच्या खेळात भारतीय गोलंदाज काय रणनिती अवलंबणार फलंदाजांना खिळवून ठेवायचे की खेळवायचे आणि चूका करायला भाग पाडायच्या हे पाहणे रंजक ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian bowlers gave a good start on day 3 against South Africa