esakal | भारताच्या माजी फुटबॉलपटूचे कोरोनामुळे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

भारताच्या माजी फुटबॉलपटूचे कोरोनामुळे निधन

भारताच्या माजी फुटबॉलपटूचे कोरोनामुळे निधन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पणजी - भारताचे माजी ऑलिंपियन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या फुटबॉलपटूचे निधन झाले. गोव्यातील फुटबॉलपटू फॉर्च्युनात फ्रांको (fortunato franco) यांना कोरोनाची (Covid 19) लागण झाली होती. सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रोममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत त्यांनी भारताचं (India) प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच 1962 साली भारताने जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा (Asian Games) स्पर्धेत दक्षिण कोरियाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं होत. फ्रांको त्या संघाचे सदस्यही होते.

फ्रांको यांना दुखापतीमुले 1966 साली बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळता आलं नव्हतं. दरम्यान, 1964 साली तेल अविव येथे झालेल्या आशिया कप, मलेशियात झालेल्या मेर्डेका कप स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेल्या भारतीय भारतीय संघात त्यांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत फ्रांको यांनी भारताकडून पन्नासहून जास्त सामने खेळले. त्यांनी संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्वही केले होते. 1963 मध्ये संतोष करंडक विजेत्या महाराष्ट्राच्या संघातील ते प्रमुख खेळाडू होते. भारतीय फुटबॉल संघात तत्कालीन दिग्गज खेळाडू पी. के. बॅनर्जी, चुनी गोस्वामी, तुळशीदास बलराम यांच्यासोबतही ते खेळले होते.

हेही वाचा: रुग्णसंख्या घटली मात्र मृत्यूदरानं चिंता वाढवली

मूळचे गोमंतकीय असलेले पण मुंबईतील फुटबॉल मैदानावर जडण घडण झालेले फॉर्च्युनात फ्रांको हे भारताचे माजी ऑलिंपियन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते फुटबॉलपटू होते. बार्देश तालुक्यातील कोलवाळ येथे 1936 साली फ्रांको यांचा जन्म झाला. त्यानंतर गोव मुक्तीच्या आधी कुटुंबियांसह ते मुंबईत आले होते. मुंबईत त्यांच्या फुटबॉल कौशल्याला प्रशिक्षणाची जोड मिळाली. त्यांनी सुरुवातीला वेस्टर्न रेल्वेचं प्रतिनिधित्वं केलं. पुढे टाटा फुटबॉल क्लबच्या प्रमुख खेळाडुंमध्ये त्यांचा समावेश झाला. 1966 मध्ये सामना खेळत असताना गुडघ्याला दुखापत झाल्यानं त्यांनी फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर फ्रांको यांनी टाटा उद्योगसमूहात वरिष्ठ व्यवस्थापकपदी (जनसंपर्क) 40 वर्षे काम केलं. 1999 साली निवृत्त झाल्यानंतर गोव्यात सासष्टी तालुक्यातील कोलवा येथे स्थायिक झाले. पत्नी मार्यटल, मुलगा जयदीप, मुलगी किरण असा फ्रांको यांच्या मागे परिवार आहे.