esakal | भारतीय हॉकी संघास रशियाचा पात्रतेत सराव
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय हॉकी संघास रशियाचा पात्रतेत सराव

भारतीय हॉकी संघास रशियाचा पात्रतेत सराव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: ऑलिंपिक प्राथमिक पात्रता स्पर्धेत भारताने रशियाचा 10-0 असा धुव्वा उडवला होता. आता त्याच रशियास पराजित करून ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची औपचारिकता भारतीय हॉकी संघास करावी लागणार आहे. दरम्यान, महिला संघासमोर खडतर ठरू शकेल अशा अमेरिकेचे आव्हान असेल. 

ऑलिंपिक पात्रतेच्या अंतिम टप्प्याच्या लढतीचा ड्रॉ आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या मुख्यालयात काढण्यात आला. या ड्रॉच्या प्राथमिक गटवारीनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्‍यता होती, पण भारताचे प्रतिस्पर्धी रशिया ठरले; तर पाकिस्तानला नेदरलॅंडस्‌ला त्यांच्या देशात पराजित करण्याचे आव्हान देण्यात आले. 
भारत-रशिया लढत एकतर्फीच होण्याची शक्‍यता आहे. जागतिक क्रमवारीत भारत पाचवा, तर रशिया 22 वा आहे. खरं तर ते या ड्रॉसाठी पात्रही ठरले नव्हते, पण इजिप्तने माघार घेतली आणि रशियाला या ड्रॉमध्ये प्रवेश लाभला. ऑलिंपिक पात्रतेच्या पहिल्या टप्प्यात भारताने रशियास 10-0 हरवले होते. ती लढत झालेल्या भुवनेश्‍वरलाच प्रतिस्पर्ध्यात दोन लढती होतील. मात्र, या लढतीतील विजय गृहीत धरण्यास भारतीय कर्णधार मनप्रीत सिंग तयार नाही. 

जूनमधील हवामान रशियासाठी प्रतिकुल होते, पण या वेळी लढत नोव्हेंबरमध्ये आहे आणि त्यामुळे त्यांचा खेळ नक्कीच सरस होऊ शकतो. कोणत्याही संघाला धक्का देण्याची त्यांची क्षमता आहे. आम्ही कोणत्याही संघाला कधीही कमी लेखत नाही. या महत्त्वाच्या लढतीत ही चूक नक्कीच करणार नाही, असे मनप्रीत सिंगने सांगितले. 

भारत आणि अमेरिका महिला हॉकी संघातील विश्‍वकरंडक स्पर्धेतील लढत 1-1 बरोबरीत सुटली होती. "आपली पूर्वतयारी चांगली असेल, तर प्रतिस्पर्धी कोण आहे हे महत्त्वाचे ठरत नाही. आम्ही या लढतींसाठी पूर्वतयारी करताना प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आमच्या खेळाचा दर्जा उंचावण्याकडेच लक्ष दिले होतो, त्यात बदल होणार नाही. सलग दोन दिवस लढत खेळण्यास आम्ही तयार होत आहोत', असे भारताची कर्णधार राणी रामपाल हिने सांगितले. 

loading image
go to top