esakal | भारताची हॉकीत पाकिस्तानवर मात 
sakal

बोलून बातमी शोधा

Indian hockey team win over Pakistan

भारताची हॉकीत पाकिस्तानवर मात 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जकार्ता : सुवर्णपदकाची मोहीम सुरू करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला अखेर ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळवलेला विजय ब्रॉंझपदकाची शान वाढवणारा ठरला. आज झालेल्या सामन्यात भारताने पाकवर 2-1 असा विजय मिळवला. 

तिसऱ्याच मिनिटाला आकाशदीप सिंगने केलेला मैदानी गोल आणि त्यानंतर हरमनप्रीत सिंगने 50 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर केलेला गोल यामुळे भारताने 2-0 अशी आघाडी घेतली होती; परंतु दोनच मिनिटांत महम्मद आकिबने पाकिस्तानसाठी गोल करून भारतीय पाठीराख्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले होते; मात्र मलेशियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अखेरच्या क्षणी केलेल्या चुका भारतीयांनी या वेळी केल्या नाहीत आणि विजय मिळेपर्यंत बचाव भक्कम ठेवला. 

जागतिक क्रमवारीत सध्या पाचव्या स्थानावर असलेला भारतीय संघ गतविजेते आणि संभाव्य विजेते म्हणून खेळत होता. उपांत्य सामन्यातील सदोष खेळामुळे अखेर दुधाची तहान ताकावर (सुवर्णऐवजी ब्रॉंझ) भागवण्याची वेळ आली. पाकिस्तानचा संघ क्रमवारीत 13 व्या स्थानी आहे. गेल्या तीन महिन्यांत भारताने या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यावर दोनदा विजय मिळवला आहे. जून महिन्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने 4-0 असा विजय संपादन केला होता. 

उपांत्य सामन्यात हार्टब्रेक झाल्यानंतर भारताने आज पाकिस्तानविरुद्ध पहिल्या मिनिटापासून आक्रमण सुरू केले. सुरवातीलाच संधी निर्माण केल्यानंतर अवघ्या तिसऱ्या मिनिटाला आकाशदीपने पाकिस्तानचा गोलरक्षक इम्रान भट्टला जराही संधी न देता मैदानी गोल केला. पाकिस्तानला पाचव्याच मिनिटाला बरोबरी करण्याची संधी मिळाली होती. आतिकने रिव्हर्सचा फटका मारून चेंडू भारताच्या गोलजाळ्यात मारला; परंतु तिसऱ्या पंचाची मदत घेतली असता चेंडू गोल लाइनच्या बाहेरून मारला असल्याचे सिद्ध झाले. या घडामोडीनंतर भारताने पहिल्या अर्धात निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. 

दुसऱ्या अर्धात मात्र पाकिस्तानने आपल्या खेळात सुधारणा केली. भारतीय गोलक्षेत्रात वारंवार हल्ले केले. महम्मद दिलबीर आणि एजाझ अहमद यांचे प्रयत्न थोडक्‍यात हुकले. 22 व्या मिनिटाला त्यांना लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले; पण त्यावरही त्यांना संधी साधता आली नाही. 

तिसऱ्या अर्धातही भारताचा खेळ काहीसा स्वैर होता. टॅपिंग आणि पासिंगमध्ये नियंत्रण नव्हते. या वेळी चेंडूचा ताबा पाकिस्तानकडेच जास्त होता. या स्वैर खेळानंतर भारतीयांनी पुन्हा जम बसवण्यास सुरवात केली आणि पाकिस्तानच्या गोलक्षेत्रात सातत्याने आक्रमणे करत त्यांच्यावर दडपण वाढवले होते. अखेर 50 व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीतने यावर गोल केला. 

0-2 पिछाडीवर पडलेल्या पाकिस्तानने लगेचच प्रतिआक्रमण केले आणि महम्मद आकिबने त्यांचा पहिला गोल केला. त्यानंतर भारताने बचाव भक्कम करून पाकिस्तानला आणखी संधी मिळू दिली नाही. 

loading image
go to top