esakal | पाकच्या सहभागामुळे भारताचे स्पर्धेला रेड कार्ड
sakal

बोलून बातमी शोधा

पाकच्या सहभागामुळे भारताचे स्पर्धेला रेड कार्ड

पाकच्या सहभागामुळे भारताचे स्पर्धेला रेड कार्ड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

यावर्षी ऑक्‍टोबरमध्ये मलेशियात होणाऱ्या सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेतून माघार
मुंबई - मलेशियातील सुलतान जोहर कुमार हॉकी स्पर्धेत पाकिस्तानचाही सहभाग असल्यामुळे भारताने या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सुलतान जोहर ही निमंत्रित संघांची स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या स्पर्धा सोडल्यास आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, या भूमिकेनुसारच भारत स्पर्धेतून माघार घेत असल्याचे हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे.

भारतात झालेल्या विश्‍वकरंडक कुमार हॉकी स्पर्धेतील सहभागासाठी असलेले नियम पाकिस्तानने पाळले नाहीत आणि असहभागासाठी भारतास दोषी धरले. याबाबत पाकिस्तानने अद्यापही माफी न मागितल्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांत पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचीच अंमलबजावणी सुलतान जोहर स्पर्धेसाठी होत आहे.

भारताचे नरिंदर बात्रा जागतिक हॉकीचे अध्यक्ष झाल्यावर त्यांची पाकिस्तान हॉकी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. त्या वेळी यापूर्वीचे वाद विसरून नव्याने थेट मालिका खेळण्याबाबत विचार सुरू करण्याचे ठरले होते; पण विश्‍वकरंडक कुमार हॉकी स्पर्धेतील सहभागाच्या नियमाची पूर्तता वेळेत न केल्याबद्दल पाकिस्तानला स्पर्धेतून दूर करण्यात आले. पाकिस्तान हॉकी महासंघाने यासाठी हॉकी इंडियास जबाबदार धरले. याबाबत पाकिस्तान बिनशर्त माफी मागत नाही, तोपर्यंत निमंत्रित स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार नाही, असे भारताने सांगितले आहे.

हॉकी इंडिया, तसेच 2014 च्या चॅंपियन्स स्पर्धेतील पाक खेळाडूंची आक्षेपार्ह कृत्य खेळाडू विसरले आहेत; पण विश्‍वकरंडक कुमार हॉकी स्पर्धा सहभागाबाबत पाकने केलेले आरोप विसरण्यास आम्ही तयार नाही. जोपर्यंत ते बिनशर्त माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही सुलतान जोहर कपसारख्या निमंत्रित स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार नाही. आपल्या चुका लपवण्यासाठी पाक हॉकी महासंघ भारतास जबाबदार धरते, हे आम्हाला मान्य नाही.
- आर. पी. सिंग, हॉकी इंडियाचे प्रवक्ते.

loading image
go to top