एअर रायफलमध्ये भारतीय पदकाविना 

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

- विश्‍वकरंडक नेमबाजी
- ऑलिंपिक कोट्यापासूनही दूर
- अंतिम फेरी गाठण्यात अपयश 

मुंबई/नवी दिल्ली ः कायम कमालीची चुरस असलेल्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाजांना घरच्या रेंजवरही कामगिरी उंचावता आली नाही. त्यांना नवी दिल्ली विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत पदक, तसेच ऑलिंपिक पात्रता मिळणाऱ्या अंतिम फेरीपासूनही दूर राहावे लागले. 

डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवरील दहा मीटर एअर रायफल प्रकारात हेंगरीचा दिग्गज नेमबाज पीटर सिडलची अंतिम फेरी 0.1 गुणांनी हुकली; तर प्राथमिक फेरीत अव्वल आणि आठव्या असलेल्या नेमबाजात अवघ्या 1.7 गुणांचा फरक होता. 

रवी कुमार, दीपक कुमार आणि दिव्यांश पन्वर या भारतीय नेमबाजांना अंतिम फेरीपासून दूरच रहावे लागले. भारतीयांत सर्वोत्तम असलेल्या दिव्यांशचे 627.2 गुण होते, तर पात्रतेत आठव्या असलेल्या नेमबाजाचे 628.4. रवी (627) आणि दीपक कुमारचे (624.3) पात्रतेत गारद झाले. गतस्पर्धेत अंतिम फेरी 0.2 गुणांनी हुकली होती, याची आठवण रवीने करून दिली. 

तेजस्विनीपात्रतेपूर्वीच बाहेर 
महिलांच्या थ्री पोझीशन स्पर्धेच्या पात्रतेसही तेजस्विनी सावंत पात्र ठरू शकली नाही. 64 लेन आणि 80 नेमबाज अशी परिस्थिती असल्यामुळे एलिमिनेशन फेरी घेण्यात आली. एलिमिनेशन दोनमध्ये असलेली तेजस्विनी 42 स्पर्धकांत 36 वी आली. जागतिक नेमबाजी संघटनेने एलिमिनेशनच्या दोन्ही फेऱ्यांतून किती नेमबाज पात्र ठरणार हे जाहीर केलेले असते. त्याची एकत्र क्रमवारी केली जात नाही. परिस्थिती समान नसल्यामुळे हा निर्णय झालेला आहे, याकडे नेमबाज मार्गदर्शक दीपाली देशपांडे यांनी लक्ष वेधले. तेजस्विनी एलिमिनेशनमध्ये बाद झाल्याने भारताच्या आशा एन गायत्री आणि सुनिधी चौहान यांच्यावर असतील.

पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिव्यांशने प्रभाव पाडला आहे. सोळा वर्षीय या युवकाने आपली सर्वोत्तम 106.9 गुणांची सीरिज नोंदवली. रविचाही स्कोअर चांगला आहे. त्याने खराब सुरवातीनंतर स्वतःला चांगले सावरले. - गगन नारंग, ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian shooters failed to make the final of the men at the ISSF World Cup