धोनीचे भवितव्य रविवारी निश्‍चित होणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

- महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याबाबत विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेपासून सुरु झालेल्या प्रश्‍नाचे  उत्तर रविवारी मिळण्याची शक्‍यता आहे.

- वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी होणाऱ्या संघ निवडीची उत्सुकता आत्तापर्यंत झालेल्या संघ निवडीपेक्षा कदाचित अधिक असेल.

- विराट कोहली विश्रांती घेणार की खेळणार? किंवा वेगवेगळे कर्णधार नियुक्त करणार याचेही उत्तर रविवारी मिळणार आहे. 

मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्याबाबत विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेपासून सुरु झालेल्या प्रश्‍नाचे उत्तर रविवारी मिळण्याची शक्‍यता आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी होणाऱ्या संघ निवडीची उत्सुकता आत्तापर्यंत झालेल्या संघ निवडीपेक्षा कदाचित अधिक असेल. विराट कोहली विश्रांती घेणार की खेळणार? किंवा वेगवेगळे कर्णधार नियुक्त करणार याचेही उत्तर रविवारी मिळणार आहे. 

एम.एस.के प्रसाद यांच्या निवड समितीला रविवारी आणखी एका मोठ्या आव्हानाला सामारे जावे लागणार आहे. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर या स्पर्धेसाठी झालेल्या संघ निवडीतील काही दोष पुढे आणण्यात आले होते. त्यामुळे सर्वांनाच टीकेचा सामना करावा लागलेला आहे. प्रसाद यांचीही त्यातून सुटका झालेली नाही. त्यामुळे विंडीज दौऱ्यासाठी प्रत्येक खेळाडूची निवड त्यांच्या समितीला सावधपणे करावी लागणार आहे. 

धोनीचे काय होणार? 
38 वर्षीय धोनीच्या निवृत्तीची बरीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्याच्यावर निवृत्तीचे दडपण टाकले जाणार अशीही चर्चा आहे. विंडीज दौऱ्याची सुरुवात तीन एकदिवसीय सामन्याने होणार असून त्यानंतर तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी मालिका होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 ची विश्‍वकरंडक स्पर्धा होणार आहे त्याचा विचार करून आत्तापासून संभाव्य खेळाडूंची चाचपणी केली जाऊ शकते. या खेळाडूंत धोनीला स्थान असणार का? यावरही निवड समितीत खल होणार आहे. वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात झालेल्या टी-20 मालिकांत धोनीला खेळवण्यात आले नव्हते. या पार्श्‍वभूमीवर धोनीची आता टी-20साठी तरी निवड होणार नाही असेच चित्र आहे, परंतु एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही तर ते त्याच्यासाठी निवृत्ती घेण्याचे संकेत असू शकतील. 

विराटची उपलबद्धता महत्वाची 
विंडीज दौऱ्यातील कसोटी मालिकेत विराट कोहली खेळणार हे निश्‍चित आहे, परंतु अगोदरच्या झटपट मालिकांत तो खेळणार का हा प्रश्‍न आहे. कसोटी आणि झटपट क्रिकेटसाठी वेगवेगळे कर्णधार नेमण्याची जोरदार मागणी काही दिवसांपासून करण्यात आली आहे. त्यामुळे कदाचीत विराट कोहली विश्रांती न घेता पूर्ण दौऱ्यासाठी उपलब्ध असल्याचे जाहीर करू शकतो. 

शिधर धवनचे पुनरागमन? 
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत 9 जून रोजी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या बोटाला दुखापत झाली होती. फ्रॅक्‍चर असल्यामुळे त्याला स्पर्धेबाहेर जावे लागले होते. आता तो तंदुरुस्त असल्यास त्याची निवड होऊ शकते. 

केदार, कार्तिकला वगळणार? 
विश्‍वकरंडक स्पर्धेत अपयशी ठरलेल्या केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांना वगळले जाण्याची शक्‍यता आहे. टी-20 साठी केदारचा विचार होणे कठिण आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये चमकलेला दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर तसेच सध्या वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या मनिष पांडेला पुनरागमनाची संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. 

बुमराला विश्रांती देणार 
जसप्रित बुमरा हा तिन्ही प्रकारात हुकमी गोलंदाज आहे. मायदेशातील पुढील भरगच्च कार्यक्रम पहाता त्याला विश्रांती दिली जाणार हे निश्‍चित मानले जात आहे. शिवाय ताशी 150 कि.मी वेगात गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला नवदीप सैनी, दीपक चहर हे पर्यायही तपासले जातील. महम्मद शमीचे स्थान निश्‍चित असू शकेल. खलिल अहमदचाही विचार होऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian squad for WI tour will be selected Sunday