सद्यस्थितीत भारतीय पाकमध्ये खेळूच शकत नाहीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सद्यस्थितीत भारतीय टेनिसपटू पाकिस्तानात खेळूच शकत नाहीत हे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने समजून घ्यायला हवे. त्यांना सर्व काही समजून सांगण्यासाठी त्यांची वेळ मागितली आहे, असे भारतीय टेनिस संघटनेचे सचिव हिरोण्मय चॅटर्जी यांनी सांगितले. डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेच्या आशिया ओशियाना गटातील लढत पुढील महिन्यात इस्लामाबादला अपेक्षित आहे.

नवी दिल्ली : सद्यस्थितीत भारतीय टेनिसपटू पाकिस्तानात खेळूच शकत नाहीत हे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने समजून घ्यायला हवे. त्यांना सर्व काही समजून सांगण्यासाठी त्यांची वेळ मागितली आहे, असे भारतीय टेनिस संघटनेचे सचिव हिरोण्मय चॅटर्जी यांनी सांगितले. डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेच्या आशिया ओशियाना गटातील लढत पुढील महिन्यात इस्लामाबादला अपेक्षित आहे.

इस्लामाबादमधील सुरक्षेचा आढावा नव्याने घेण्याबाबतचे पत्र आम्ही यापूर्वीच आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघास पाठवले आहे. त्या पत्रासोबत त्यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा करण्याबाबत वेळ मागितली आहे. दोन देशांतील सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे, हे त्या वेळेस त्यांना समजावून सांगता येईल, असे चॅटर्जी यांनी एका खासगी वृत्तसंस्थेस सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांतील घडामोडींनंतर परिस्थितीत काय बदल झाला आहे हे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाला नेमके समजलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत कोणीही भारतीय खेळाडू तिथे जाऊन खेळू शकत नाही. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे आमच्या पत्रास उत्तर आल्यानंतरच त्यानुसार निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

अवघ्या काही दिवसांपर्यंत भारतीय टेनिस संघटना आमचा संघ पाकिस्तानात खेळणार आहे असेच सांगत होते. आता न खेळण्याची तयारीच भारतीय टेनिस संघटनेने सुरू केली आहे असे मानले जात आहे.

भारताने घटनेतून 370 कलम रद्द केल्यापासून भारत आणि पाकिस्तान देशातील संबंध बिघडले आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे आणि आयटीएफचा निर्णय पाकिस्तान मान्य करणे भाग पडेल, असे मत पाकिस्तान टेनिस महासंघातील काही पदाधिकाऱ्यांचे असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय टेनिस संघ 1964 पासून पाकिस्तानात खेळलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian tennis team can't play in pakistan