esakal | भारताचा सलामीलाच विक्रमी 17 गोलचा धडाका 
sakal

बोलून बातमी शोधा

India's first ever 17-goal

भारताचा सलामीलाच विक्रमी 17 गोलचा धडाका 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जकार्ता : भारतीय पुरुष हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंदर सिंग हे सहा गोलची आघाडी असेल तर ती आठ गोलची करा, असेच सांगत असतात. नेमके हेच भारतीय संघाने आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेतील इंडोनेशियाविरुद्धच्या लढतीत केले. स्पर्धा इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवताना त्यांनी इंडोनेशियाला 17-0 असे हरवले. 

भारतीयांचे वर्चस्व एकतर्फी होते. शूअर्ड मरिन यांच्यापेक्षा हरेंदर खूपच सरस असल्याचे दाखवणारे होते. मरिन यांच्या मार्गदर्शनाखालील महिला संघाने ताकद राखून ठेवण्याकडे लक्ष दिले; तर हरेंदर यांच्या संघाने विश्रांती घेतली नाही. त्यांनी आपणच संभाव्य विजेते आहोत, कोणालाही दयामाया दाखवणार नाही, असाच खेळ केला. इंडोनेशियाला मैदानी गोलची एकच संधी लाभली, त्यावरही ते गोल करू शकले नाहीत; पण ही बाब सोडल्यास भारताचेच निर्विवाद वर्चस्व होते. 

भारताचा आशियाई क्रीडा स्पर्धा इतिहासातील सर्वात मोठा 13-0 विजय बांगलादेशविरुद्धचा आहे. त्यास सहज मागे टाकले. त्याहीपेक्षा हरेंदर यांना आपले आक्रमणातील यश सुखावत असेल. एकंदर 40 शॉट्‌सवरील 17 गोल, अर्थात 43 टक्के यशस्विता नक्कीच चांगली आहे. मैदानी गोलचे 28 पैकी 10 प्रयत्न यशस्वी झाले, तर 11 पैकी सहा पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लागले. त्याचबरोबर पेनल्टी स्ट्रोकवरही एक गोल झाला. त्याचबरोबर रूपिंदर पाल सिंग, ललित उपाध्याय, हरमनप्रीत सिंग, विवेक प्रसाद, एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, सिमरनजित सिंग, दिलप्रीत सिंग, अमित रोहिदास या एकंदर 10 खेळाडूंनी गोल केले, ही बाबही मोलाची आहे. त्यातही मनदीप, सिमरनजित आणि दिलप्रीतने प्रत्येकी तीन गोल केले, तर रूपिंदरने दोन. भारतास मात्र याचवेळी पाकिस्तानचा सर्वाधिक मोठ्या विजयाचा विक्रम मोडू शकलो नाही, हे सलत असेल. 

पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी 
आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेतील सर्वांत मोठ्या विजयाची बरोबरी भारताने साधली. पाकिस्तानने 1978 च्या स्पर्धेत बांगलादेशला 17-0 असे हरवले होते; पण भारतास याची बरोबरीच करता आली; असे हॉकी सांख्यिकीतज्ज्ञ बी. जी. जोशी यांनी सांगितले. भारताने यापूर्वी दोनदा 12-0 विजय मिळविला आहे, पहिल्यांदा 1974 च्या स्पर्धेत इराणविरुद्ध, तर 1982 च्या स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध. हा विक्रम मात्र मोडीत निघाला. 

loading image
go to top