विजयकडून जॉर्जियाचा पैलवान चित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

विटा - आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या महादंगलीत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (पुणे) याने जॉर्जियाच्या टेडोरे लेब्नॉईझे (जॉर्जिया) याला घिसा डावावर अस्मान दाखवत सात लाखांचे बक्षीस जिंकले. 

विटा - आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या महादंगलीत प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी (पुणे) याने जॉर्जियाच्या टेडोरे लेब्नॉईझे (जॉर्जिया) याला घिसा डावावर अस्मान दाखवत सात लाखांचे बक्षीस जिंकले. 

द्वितीय क्रमांकासाठी सहा लाखाच्या दोन कुस्त्या झाल्या. त्यात महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखने परवेझ दिल्ली याला पोकळ घिसा डावावर चितपट करत कुस्ती जिंकली. ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादवने भारत केसरी कमलजीत सिंगला घिसा डावावर चित केले. पाच लाख इनामाच्या कुस्तीत राहुल आवाराने सोनू कुमारला हप्ता डावावर पराभूत केले. दोन लाख इनामाच्या कुस्तीत माऊली जमदाडेने मथुरेच्या उमेशकुमारला घिसा डावावर चित केले. 

दीड लाखाच्या दोन कुस्त्या झाल्या. त्यात भारत मदनेने हप्ता डावावर कौतुक डाफळेला अस्मान दाखविले. योगेश बोंबाळेला संतोष दोरवडने घुटना डावावर पराभूत करत विजय मिळविला. 
या मुख्य लढतींसह लहान-मोठ्या अनेक चटकदार कुस्त्यांनी शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कुस्ती मैदानात हजारो शौकीनांनी हजेरी लावली. हलगीच्या कडकडाटात मल्लांना प्रोत्साहन दिले जात होते. 

 आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, अभिजीत कदम, सयाजी बाबर, अमर शितोळे, किरण पाटील, दिलीप किर्दत, भारत पवार, तानाजी बाबर, शहाजी पाटील उपस्थित होते.  संयोजन चंद्रहार पाटील यांनी केले. निवेदन शंकर पुजारी, परशुराम पवार, सुरेश गवळी, जोतीराम वाझे यांनी केले. पंच म्हणून हणमंत जाधव पुणदीकर, काका पवार यांनी काम पाहिले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: International wrestling competition