esakal | CSKकडून लाजीरवाणा पराभव, अव्वल स्थान गमावले अन् विराटला आर्थिक दंडही

बोलून बातमी शोधा

virat

CSK कडून लाजीरवाणा पराभव, अव्वल स्थान गमावले अन् विराटला आर्थिक दंडही

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबीचा विजयरथ धोनीच्या चेन्नईनं रोखला. यंदाच्या हंगामात विराट कोहलीचा हा पहिलाच पराभव झाला. वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात आरसीबीचा दारुण पराभव करत धोनीचा चेन्नई संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचला आहे. समान गुण असतानाही नेट रनरेट कमी असल्यामुळे विराट कोहलीचा आरसीबी संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पराभव झाला, त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल स्थान गेलं यातच भर म्हणून सामन्यानंतर विराट कोहलीला आयपीएल समितीनं दंड ठोठावला आहे.

रविवारी झालेल्या सामन्यात षटकांची गती न राखल्यामुळे (स्लो ओव्हर रेट) विराट कोहलीला दंड ठोठावण्यात आला आहे. विराट कोहलीला स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. याआधी एम. एस. धोनी, रोहित शर्मा आणि मॉर्गन या कर्णधारालाही स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचा दंड भरावा लागला होता. उर्वरित स्पर्धेदरम्यान दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी आढळल्यास कर्णधारासह खेळाडूंनाही दंड आकारण्यात येतो. आधी सामना गमावला, त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल स्थान गमावले अन् 12 लाखांचा दंडही... असं विराट कोहलीला तिहेरी दणका बसला आहे.

विराट कोहलीचा आरसीबी संघ चार विजयासह गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थिती विराट कोहलीला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंनी वयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. आरसीबीनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. युवा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. आरसीबीनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबतची माहिती दिली आहे. 'अधिकृत घोषणा! अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन वयक्तिक कारणामुळे ऑस्ट्रेलियात परतणार आहेत. त्यामुळे उर्वरित आयपीएल सामन्यासाठी ते अनुपलब्ध असतील. त्यांच्या या निर्णयाचा आरसीबी संघ व्यवस्थापनानं आदर केला असून पाठिंबाही दर्शवला आहे. '