IPL 2023 पूर्वी बदललेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार, रोहित शर्मा अचानक बाहेर | Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 Mumbai Indians :

IPL 2023 पूर्वी बदललेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार, रोहित शर्मा अचानक बाहेर

IPL 2023 Mumbai Indians : आयपीएलचा 16वा हंगामा सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. त्याच वेळी खेळाडू आपापल्या घरच्या मैदानावर जोरदार सराव करत आहेत. पण याच दरम्यान मुंबई इंडियन्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा या हंगामातील सुरुवातीचे सामने खेळू शकणार नसल्याचे वृत्त आहे.

इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, रोहित शर्मा वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर असेल. आयपीएल फायनलनंतर टीम इंडियाला एका आठवड्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायची आहे. त्याचबरोबर यानंतर सर्व खेळाडू मायदेशात होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीला लागतील.

रोहितच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल. सूर्यकुमार दीर्घकाळापासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. त्याचबरोबर रोहित डगआऊटमध्ये बसूनच सामन्यावर लक्ष केंद्रित करेल. रोहित याआधीही जास्त कामाच्या बोजामुळे जखमी झाला आहे. अशा स्थितीत त्याला आयपीएलमध्ये शरीरावर फारसा भार टाकायचा नाही.

सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षभरात टी-20 क्रिकेट गाजवल आहे. या फॉरमॅटमध्ये सूर्या जगातील नंबर वन बॅट्समन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्याला यंदाच्या आयपीएलमध्ये पाहणे खास असणार आहे.

त्याच वेळी, तो आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा मोठा दावेदार आहे. सूर्याने आयपीएलमध्ये 62 सामने खेळले आणि 59 डावात 1575 धावा केल्या. सूर्यकुमारची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 82 धावा आहे. त्याच्याकडे आयपीएल मध्ये 10 अर्धशतके आहेत.