
Ishan Kishan Virat Kohli : इशान किशनचा खुलासा; विराटने 'तो' सल्ला दिला म्हणून झालं द्विशतक
Ishan Kishan Virat Kohli : भारत - बांगलादेश तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत बांगलादेश समोर 410 धावांचे मोठे आव्हान ठेवले. भारताला तिसऱ्या वनडे सामन्यात 400 धावांचा टप्पा पार करून देण्यात सलामीवीर इशान किशनने ठोकलेल्या 210 धावांचे मोठे योगदान होते. त्याने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 305 धावांची दमदार भागीदारी रचली. विराटनेही आपले 72 वे शतक (113) ठोकत त्याला उत्तम साथ दिली. दरम्यान, आपले वनडेमधील पहिलेच शतक द्विशतकात रूपांतरित करणाऱ्या इशान किशनला भारताचा डाव झाल्यावर विराटसोबतच्या या भागीदारीबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने विराटने त्याला मोक्याच्या क्षणी दिलेला सल्ला कसा कामाला आला हे सांगितले.
बांगलादेशविरूद्ध 210 धावांची धडाकेबाज खेळी केल्यानंतर सोनी स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'सचिन तेंडुलक, रोहित शर्मा, विरेंद्र सेहवाग आणि इतर सर्व वनडेत द्विशतक ठोकणाऱ्या दिग्गजांसोबत माझे नाव जोडले गेल्याने माला खूप भारी वाटत आहे.' दरम्यान, समालोचकाने त्याला विराट आणि त्याच्या भागीदारीविषयी विचारले. त्यावेळी इशान किशन म्हणाला की, 'विराट कोहलीबरोबर खेळणं जबरदस्त असतं. त्यानेच मला वेळोवेळी शांत केलं. मी त्याला माझे शतक पूर्ण करण्यासाठी षटकार मारणार असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने मला तसं न करण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला की हे तुझे पहिले शतक आहे. सावधपणे खेळ.'
विराट कोहली अनेकवेळा युवा खेळाडूंना त्यांच्या पहिल्या शतकासाठी किंवा अर्धशतकासाठी मदत करून प्रोत्साहन देताना आपण पाहिले आहे. विराट आणि इशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 305 धावांची भागीदारी रचल्यानंतर भारताची मधील फळी ढेपाळी होती. केएल राहुल 8 तर श्रेयस अय्यर 3 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सहाव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी रचत भारताला 390 धावांपर्यंत पोहचवले. अक्षर 20 धावा करून बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने 27 चेंडूत 37 धावा करत भारताला 400 चा टप्पा ओलांडून दिला.
हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’