INDvsWI : जडेजाच्या अर्धशतकामुळे भारताच्या 297 धावा

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

पावसाच्या लंपडावात झालेल्या पहिल्या डावाच्या खेळात भारताने 6 बाद 203 धावा केल्या होता.

अँटिग्वा : अष्टपैलू खेळाडू म्हणून अंतिम संघात स्थान देण्यात आलेल्या रवींद्र जडेजाने फलंदाजीतील जबाबदारी चोख पार पाडली त्याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 297 धावांपर्यंत मजल मारली. 

पावसाच्या लंपडावात झालेल्या पहिल्या डावाच्या खेळात भारताने 6 बाद 203 धावा केल्या होता. रिषभ पंत आणि जडेजा यांनी आजचा खेळ सुरु केला, पण आशादायी चित्र निर्माण करून पंत नेहमीप्रमाणे बाद झाल्यावर जडेजाने अखेरपर्यंत किल्ला लढवला त्यामुळे जेथे अडीचशे धावा कठिण वाटत होत्या तेथे त्रिशकी धावांच्या जवळ मजल मारता आली. 

सहा चौकार आणि एका षटकारासह 58 धावा करणारा जडेजा शेवटी बाद झाला त्याअगोदर आज सकाळी पंत माघारी फिरला तरी त्याने संयम कायम राखला. विशेष म्हणजे त्याला ईशांत शर्माने आठव्या विकेटसाठी मोलाची साथ दिली या दोघांनी 60 धावांची भागीदारी केली. 

गॅब्रियलने हळूवार चेंडूवर ईशांतला बाद केले त्यानंतर लगेचच रॉस्टन चेसने शमीला माघारी धाडले. पण अखेरचा फलंदाज बुमराची साथ मिळवत जडेजाने अर्धशतक पूर्ण केले. 
त्या अगोदर काल पहिल्या दिवशी संकटात सापडलेल्या भारताला उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेने सावरले. 10 खणखणीत चौकारांसह त्याने 81 धावांची खेळी केली. त्याच्याकडून शतकाची अपेक्षा केली जात असताना गॅब्रियलने त्याला बाद केले होते. 

संक्षिप्त धावफलक :
भारत, पहिला डाव : सर्वबाद 297 (केएल राहुल 44, अजिंक्‍य रहाणे 81, हनुमा विहारी 32, रिषभ पंत 24, रवींद्र जडेजा 58, ईशांत शर्मा 19, केमार रोच 25-6-66-4, गॅब्रियल 22-5-71-3, रॉस्टन चेस 16-3-58-3)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jadejas 58 help India stretch to 297 runs against West Indies