INDvsWI : हवा चांगली होती, बॉल आऊटस्वींग केला अन् घेतल्या पाच विकेट.. Simple!

वृत्तसंस्था
Tuesday, 27 August 2019

''त्या दिवशी हवा चांगली वाहत होती. चेंडू इनस्वींगच्याऐवजी आऊटस्वींग केला आणि पाच विकेट घेतल्या,'' अशा शब्दांत त्याने आपल्या खेळीचे वर्णन केले आहे.

नॉर्थ साऊंड : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 318 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरासमारे अक्षरशः लोटांगण घातले. अवघ्या सात धावांत त्याने विंडीजचा निम्मा संघ गारद केला. ''त्या दिवशी हवा चांगली वाहत होती. चेंडू इनस्वींगच्याऐवजी आऊटस्वींग केला आणि पाच विकेट घेतल्या,'' अशा शब्दांत त्याने आपल्या खेळीचे वर्णन केले आहे. 

रोहित शर्माने सामन्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि जसप्रित बुमराची मुलाखत घेतली. त्यामध्ये बोलताना जसप्रित म्हणाला, ''त्या दिवशी हवा चांगली वाहत होती. चेंडू इनस्वींगच्याऐवजी आऊटस्वींग केला आणि पाच विकेट घेतल्या.'' 

या कामगिरीने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज देशांच्या पदार्पणाच्या दौऱ्यात पाच गडी बाद करणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरण्याचा करिष्मा त्याने केला. 

बुमराची कामगिरी ही भारतीय गोलंदाजांत सर्वोत्तम ठरली. इतक्‍या कमी धावा देऊन पाच गडी बाद करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. विंडीजमध्ये एक काळ त्यांचे वेगवान गोलंदाज आग ओकायचे, पण रविवारी सर व्हिवियन रिचर्डस मैदानावर भारतीय गोलंदाज विंडीज फलंदाजांवर वीज कोसळावी तसे कोसळले. 

विजयासाठी 419 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या सात षटकांतच त्यांची अवस्था 5-15 अशी झाली. बुमराने त्यांची नांगीच मोडली. विंडीज फलंदाज त्याच्यासमोर साधे उभेही राहू शकले नाहीत. विंडीजचे फलंदाज त्याच्यासमोर नवशिके वाटले. 

बुमरा म्हणाला,"गोलंदाज म्हणून जेव्हा प्रतिस्पर्धी संघांवर आम्ही दडपण टाकतो, तेव्हा आनंद होते. आम्ही आमच्या क्षमतेचा फायदा घेतला आणि नियोजनावर ठाम राहिलो. मी जसा खेळत राहिलो, तसा माझा आत्मविश्‍वास वाढत गेला. या सामन्यात वापरण्यात येणाऱ्या ड्यूक चेंडूचीही मला साथ मिळाली. जेव्हा चेंडू स्विंग होत नाही, तेव्हा चेंडूच्या सीमचा उपयोग करून घ्यायचा ही माझी गोलंदाजीची पद्धत आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jasprit Bumrah explains how he took 5 wicket haul by out swinging the ball