बुमराला अतिपरिश्रम; थेट 'या' मालिकेत पुनरागमन

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पाठीच्या खालील बाजूस मणक्‍यामध्ये फ्रॅक्‍चर झाल्याने बुमरा या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. आता संघ व्यवस्थापन विंडीजविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत त्याचे पुनरागमन होईल, अशी शक्‍यता बाळगून आहे. 

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला पाठीच्या दुखापतीमुळे मुकावे लागलेल्या वेगवान गालंदाज जसप्रित बुमरासाठी येणारा काळ 'कसोटी'चा ठरणार आहे. संघाला त्याची असणारी गरज आणि महत्त्व लक्षात घेता संघ व्यवस्थापन त्याच्या पुनरागमनाची घाई करण्याच्या मनस्थितीत नाही. त्याला शंभर टक्के तंदुरुस्त होण्यासाठी पूर्ण वेळ देण्याचे संघ व्यवस्थापनाने ठरवले असल्यामुळे त्याचे भारतीय संघातील पुनरागमन लांबणीवर पडले आहे यात शंका नाही. 

पाठीच्या खालील बाजूस मणक्‍यामध्ये फ्रॅक्‍चर झाल्याने बुमरा या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. आता संघ व्यवस्थापन विंडीजविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत त्याचे पुनरागमन होईल, अशी शक्‍यता बाळगून आहे. 
बुमराला पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ देणे अपेक्षित आहे, असे सांगून कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री त्याच्या समावेशाची घाई करण्याच्या तयारीत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

त्यामुळे बांगलादेशाविरुद्धच्या दौऱ्यासाठी त्याचा विचार होणार नाही, हेच यावरून स्पष्ट होते. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत बुमराने खेळणे अपेक्षित आहेत. त्यामुळे बुमराच्या तंदुरुस्तीसाठी कुठल्याही प्रकारचे 'शॉर्ट कट' वापरायचे नाहीत, यावर संघ व्यवस्थापन ठाम आहे. साहजिकच यावर्षी होणाऱ्या कसोटी सामन्यात बुमरा खेळताना दिसणार नाही. 

भारतीय संघ सातत्याने क्रिकेट खेळत आहे. एकामागून एक सामने भारतीय खेळत आहेत. त्यामुळे खेळाडूंवरील ताण कमी करण्याची वेळ आता आली आहे. नाहीतर बुमरासारख्या अनेक खेळाडूंना आपल्याला गमवावे लागेल, असे संघ व्यवस्थापनाला वाटत आहे. एकूणच बुमराची दुखापत ही भारतीयांना खेळाडूंवरील ताणाची ओळख करुन देणारी ठरली, असे मत क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

बुमराचे पुनरागमन लांबण्याची कारणे 
- सततच्या क्रिकेटमुळे अतिपरिश्रम आणि थकवा 
- पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आवश्‍यक 
- तंदुरुस्त होण्यासाठी पूर्ण वेळ देणार, 'शॉर्ट कट' घेण्याची तयारी नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- सट्टेबाजी केल्याप्रकरणी या संघाच्या मालकाला अखेर झाली अटक

- कोहलीला भासतीये धोनीची कमतरता; म्हणून रोहितकडे मागितली ही मदत

- टीम बाहेर गेलेल्या बुमराचे भावनिक ट्विट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jasprit Bumrah unlikely to play Test cricket in 2019