बुमरा, ईशांतपुढे विंडीज गारद; भारताचा 318 धावांनी विजय

वृत्तसंस्था
Monday, 26 August 2019

भारताने विंडीजसमोर विजयासाठी ठेवलेल्या 419 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ अवघ्या 100 धावा करू शकला. विंडीजचा निम्मा संघ 7.3 षटकांतच 15 धावांत गारद झाला होता. त्यानंतर तळातल्या फलंदाजांनी प्रतिकार संघाला मानहानिकारक धावसंख्येपासून वाचविले.

नॉर्थ साउंड (अँटिगा) : जसप्रीत बुमरा, ईशांत शर्मा आणि महंमद शमी या भारतीय वेगवान गोलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या फलंदाजांची भंबेरी उडविल्याने भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल 318 धावांनी विजय मिळविला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताने विंडीजसमोर विजयासाठी ठेवलेल्या 419 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ अवघ्या 100 धावा करू शकला. विंडीजचा निम्मा संघ 7.3 षटकांतच 15 धावांत गारद झाला होता. त्यानंतर तळातल्या फलंदाजांनी प्रतिकार संघाला मानहानिकारक धावसंख्येपासून वाचविले. चेस, रोच आणि कमिन्स या गोलंदाजांना दुहेरी धावा करता आल्या, बाकी सर्व फलंदाज अपयशी ठरले. भारताकडून सर्वांत यशस्वी गोलंदाज बुमराने पाच बळी घेत विंडीजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला ईशांतने 3 आणि शमीने 2 बळी घेत चांगली साथ दिली. 

त्यापूर्वी अजिंक्‍य रहाणे (102) आणि हनुमा विहारी (93) यांच्या दमदार फलंदाजीने भारताने आपला दुसरा डाव 7 बाद 343 धावसंख्येवर घोषित करून विंडीजसमोर 419 धावांचे आव्हान ठेवले होते. चौथ्या दिवशी पहिल्या षटकातच विराट कोहली बाद झाला. मात्र, याचा भारतीय फलंदाजीवर फारसा परिणाम झाला नाही. रहाणेने हनुमा विहारीच्या साथीत भारताचे आव्हान भक्कम केले. कारकिर्दीतले दहावे शतक साजरे करताना त्याने विहारीच्या साथीत पाचव्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी केली. रहाणेने संयमाने फलंदाजी करताना कारकिर्दीमधील दहावे शतक साजरे केले.

विहारीनेदेखील अर्धशतक पूर्ण केले. मात्र, शतकानंतर रहाणे लगेच बाद झाला. त्याने 242 चेंडूंत अवघ्या पाच चौकारांच्या साहाय्याने 102 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर रिषभ पंतला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. त्याने सातच धावा केल्या. तोपर्यंत विहारी शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता. मात्र, शतकासाठी सात धावांची आवश्‍यकता असताना तो बाद झाला आणि कर्णधार कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित केला. विहारीने 128 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकारासह 93 धावा केल्या. 

संक्षिप्त धावफलक : भारत 297 आणि 7 बाद 343 घोषित (अजिंक्‍य रहाणे 102, हनुमा विहारी 93, विराट कोहली 51, चेस 4-132) विजयी वि. वेस्ट इंडीज 222 आणि 26.5 षटकांत सर्वबाद 100 (जसप्रीत बुमरा 5-7, ईशांत शर्मा 3-31, महंमद शमी 2-13) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jasprit Bumrahs 5 for 7 and Ajinkya Rahanes ton help for Indias record win against West Indies