esakal | जितेंदर सुशीलचे दरवाजे बंद करणार?
sakal

बोलून बातमी शोधा

जितेंदर कुमार

जितेंदर कुमारने सुशील कुमारच्या अनुपस्थितीत भारतीय कुस्ती संघातील स्थानासाठी झालेल्या 74 किलो गटाच्या निवड चाचणीत बाजी मारली. जागतिक स्पर्धेच्या चाचणीतील निर्णायक लढतीत जितेंदर सुशीलविरुद्ध पराजित झाला होता, पण त्या लढतीचा निकाल वादग्रस्त ठरला होता.

जितेंदर सुशीलचे दरवाजे बंद करणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जितेंदर कुमारने सुशील कुमारच्या अनुपस्थितीत भारतीय कुस्ती संघातील स्थानासाठी झालेल्या 74 किलो गटाच्या निवड चाचणीत बाजी मारली. जागतिक स्पर्धेच्या चाचणीतील निर्णायक लढतीत जितेंदर सुशीलविरुद्ध पराजित झाला होता, पण त्या लढतीचा निकाल वादग्रस्त ठरला होता.

जागतिक स्पर्धेच्या चाचणीच्या तुलनेत यावेळी जितेंदर जास्त आक्रमक होता, तसेच त्याच्या तंत्रातही सुधारणा दिसली. दरम्यान, जागतिक स्पर्धेतील पदक विजेते दीपक पुनिया (86 किलो) आणि रवी दहिया (57 किलो) यांना घामही गाळावा लागला नाही, तर सुमीत मलिक (125 किलो) आणि सत्यव्रत काडियन (97किलो) यांनीही भारतीय संघातील स्थान पक्के केले.

भारतीय कुस्ती संघाची चाचणी विविध गटांसाठी होती, पण सर्वांचे लक्ष 74 किलो गटाकडेच होते. त्यातील अंतिम लढतीत जितेंदरने अमित धनकरचा 5-2 असा पाडाव केला. यामुळे तो जागतिक मानांकन मालिकेतील स्पर्धा (15 ते 18 जानेवारी, इटली), आशियाई स्पर्धा (18 ते 23 फेब्रुवारी, नवी दिल्ली) तसेच आशियाई ऑलिंपिक पात्रता (27 ते 29 मार्च - झिआन, चीन) या स्पर्धेत खेळणार असे ठरले आहे. मात्र आशिया स्पर्धेत अपेक्षित कामगिरी न झाल्यास नव्याने चाचणी होऊ शकेल, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांनी सांगितले.

पहिल्या दोन स्पर्धांत चांगली कामगिरी न झाल्यास ऑलिंपिक पात्रता स्पर्धेपूर्वी नव्याने चाचणी होऊ शकेल. ऑलिंपिकसाठी भारताचे जास्तीत जास्त कुस्तीगीर पात्र ठरावेत, हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी चाचणीतही सर्वोत्तम कुस्तीगीर असावेत याकडेच लक्ष असेल, असे शरण यांनी सांगितले.


राष्ट्रीय चाचणीत खेळल्याशिवाय कोणताही कुस्तीगीर थेट ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत खेळणार नाही. पात्रता स्पर्धेपूर्वीच्या दोन स्पर्धात चांगली कामगिरी झाल्यास नव्याने चाचणीची गरजच भासणार नाही.
- ब्रिजभूषण शरण, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष

... तर सुशीलसाठी ऑलिंपिकचे दरवाजे बंद
जितेंदर कुमारने इटली तसेच आशियाई स्पर्धेत पदक जिंकल्यास त्याचीच आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी निवड होईल. त्याशिवाय पर्यायच नसेल. या परिस्थितीत सुशीलसाठी ऑलिंपिक पात्रता स्पर्धेचे दरवाजे बंद होतील. जितेंदरने पात्रता स्पर्धेद्वारे ऑलिंपिक प्रवेश मिळवला तर सुशील ऑलिंपिकला जाण्याचा प्रश्‍नच येत नाही, असेही भारतीय कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 
loading image