रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन केएलने विराटच्या हातावर मारला हात | KL Rahul Bangladesh Vs India 1st Test Day 3 Follow On | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bangladesh Vs India 1st Test Day 3 Follow On

KL Rahul : रोहितच्या अनुपस्थितीत कॅप्टन केएलने विराटच्या हातावर मारला हात

Bangladesh Vs India 1st Test Day 3 Follow On : भारत आणि बांगालादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने पहिल्या डावात 254 धावांची आघाडी घेतली. भारत बांगलादेशला फॉलोऑन देऊ शकला असता मात्र काळजीवाहू कर्णधार केएल राहुलने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कसोटीत आक्रमकपणे खेळण्याचा विराट कोहलीचा कित्ता केएल राहुलने देखील गिरवला.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने पहिल्या डावात 404 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने बांगलादेशची अवघ्या दोन सत्रात 8 बाद 133 धावा अशी अवस्था करून सामन्यावर आपली पकड मजबूत केली. यानंतर तिसऱ्या दिवशी मेहदी हसन आणि इबादतने झुंज दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलदीप यादवने इबादतला 17 धावांवर बाद केले. त्यानंतर अक्षर पटेलने झुंज देणाऱ्या मेहदी हसन मिराजला 25 धावांवर बाद करत बांगलादेशचा पहिला डाव 150 धावाच संपवला. भारताकडे 254 धावांची भक्कम आघाडी होती.

भारत बांगालेदशला फॉलोऑन देऊ शकला असता. मात्र कसोटीचा तिसरा दिवस हा सहसा फलंदाजीला पोषक असतो. त्यामुळे भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बांगलादेशसमोर चौथ्या आणि पाचव्या दिवशी मोठे टार्गेट असण्याची शक्यता आहे. सहसा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी खेळपट्टी फलंदाजांना थोडी साथ देणारी झालेली असते. याचाच फायदा घेऊन भारत बांगलादेशला विजयासाठी अशक्यप्राय आव्हान देईल.

बांगलादेश ज्यावेळी आपला दुसरा डाव सुरू करेल त्यावेळी त्यांना चौथ्या दिवशीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करावी लागणार आहे. या कसोटीत पहिल्या दिवसापासून चेंडू फिरकी घेत आहे. त्यामुळे बांगलादेशला चौथ्या दिवशीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे फार जड जाण्याची शक्यता आहे. हीच रणनिती ओळखून केएल राहुलने फॉलो ऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

तसेही कसोटी क्रिकेट जगतात सध्या बॅझबॉलची खूप चर्चा सुरू आहे. मात्र भारताने माजी कर्णधार विराट कोहलीच्याच नेतृत्वाखाली कसोटीत आक्रमकपणे खेळण्याची पद्धत अवलंबली आहे. विराटच्या म्हणण्यानुसार आम्ही सहसा सामना ड्रॉ करण्यासाठी खेळत नाही. एकतर सामन्यात विजय मिळेल किंवा पराभव मात्र आम्ही आक्रमकच खेळणार असे त्याचे म्हणणे होते. या वृत्तीमुळे कसोटी क्रिकेट देखील फार रंजक झाले आहे.