खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचे वर्चस्व

वैभव, रणजित, निखिल, नितीन, साकेत, दिग्विजय सुवर्णपदकाचे मानकरी
Kolhapur Pune wrestlers dominate in Khashaba Jadhav state level wrestling tournament
Kolhapur Pune wrestlers dominate in Khashaba Jadhav state level wrestling tournamentSakal

उदगीर : खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापूर व पुण्यातील मल्लांचे वर्चस्व दिसून आले. कोल्हापूरचा रणजित पाटील, पुणे जिल्ह्याचा निखिल कदम व पुणे शहरचा साकेत यादव या मल्लांनी फ्री स्टाईल प्रकारात आपापल्या वजनी गटात बाजी मारून सुवर्णपदक पटकावले.

ग्रीको रोमन प्रकारात कोल्हापूरचा वैभव पाटील, नितीन कांबळे व पुणे जिल्ह्याचा दिग्विजय भोंडवे यांनी आपापल्या गटात वर्चस्व गाजवत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सुरू आहे.

फ्री स्टाईल प्रकारातील ५७ किलो वजनी गटात शेतकऱ्याचा मुलगा आणि गतविजेता रणजित पाटील याने यंदाही निर्विवाद वर्चस्व गाजवत दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने अंतिम लढतीत लातूरच्या आकाश गदेला १०-० गुण फरकांनी लोळवले. आकाशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

या गटात अहमदनगरचा ओम वाघ व सांगलीचा निनाद बडरे ब्राँझपदकाचे मानकरी ठरले. ७० किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याच्या निखिल कदमने कोल्हापूरच्या नीलेश हिरूगडेचा ३-० गुण फरकाने पाडाव करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

नीलेशला रौप्यपदकावर मिळाले, तर कोल्हापूरचा अनुप पाटील व साताऱ्याचा ओंकार फडतरे यांनी ब्राँझपदक जिंकले. ९७ किलो वजनी गटात पुणे शहरचा साकेत यादव सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

अंतिम लढतीत साकेतकडून ११-० फरकाने दारूण पराभव झाल्याने कोल्हापूरच्या शशिकांत बांगरला रौप्यपदक मिळाले. सोलापूरचा लक्ष्मण पाटील व साताऱ्याचा अजय थोरात हे ब्राँझपदकाचे मानकरी ठरले.

सांगलीच्या प्रतीक्षा बागडीला सलग दुसरे सुवर्ण

डबल महाराष्ट्र केसरी व एक वेळची राष्ट्रीय पदकविजेती सांगलीची प्रतीक्षा बागडी हिने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ७६ किलो गटात सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकले.

पोलिस हवालदाराची मुलगी असलेल्या प्रतीक्षाने सुवर्णपदकाच्या लढतीत कोल्हापूरच्या वेदिका सासणेचा ७-१ गुण फरकाने धुव्वा उडविला. वेदिकाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुणे जिल्ह्याची सिद्धी शिंदे व कोल्हापूरची अंकिता फातले ब्राँझपदकाच्या मानकरी ठरल्या. ५९ किलो गटात पुणे शहरची कल्याणी गदेकर हिने सुवर्णपदकावर नाव कोरले.

पुणे जिल्ह्याच्या आकांक्षा नलावडेला रौप्यपदक, तर कोल्हापूरच्या सृष्टी भोसलेला ब्राँझपदक मिळाले. ५० किलो गटात पुणे शहरची ज्ञानेश्वरी पायगुडे व कोल्हापूरची आर्या पाटील यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. कोल्हापूरची प्रमिला पवार व अहमदनगरची आयशा शेख यांना ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

महिला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुस्ती या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन उदगीरसारख्या ग्रामीण भागात होत असून नागरिकांना मोठे अप्रूप वाटत आहे. या कुस्ती स्पर्धेत मुलीही कुस्ती खेळणार असल्याने कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकगृहांमध्ये महिला दर्शकांची लक्षणीय उपस्थिती व त्यांचा मिळणारा प्रतिसाद खेळाडूंना उत्साह देणारा आहे. चार हजार कुस्तीप्रेमी बसतील, अशी सोय आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रेक्षकगृह खचाखच भरलेले दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com