राजकुंवरने राष्ट्रीय नेमबाजीत कोल्हापूरचे नाव मोठे करावं, वडिलांची इच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकुंवरने राष्ट्रीय नेमबाजीत कोल्हापूरचे नाव मोठे करावं, वडिलांची इच्छा

राजकुंवरने राष्ट्रीय नेमबाजीत कोल्हापूरचे नाव मोठे करावं, वडिलांची इच्छा

पुणे : बालेवाडीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात १६ आणि १७ मे रोजी पार पडलेल्या इझिकेल ट्रस्ट आयोजित महाराष्ट्र राज्य ट्रॅप शूटिंग या क्रीडा प्रकारात कोल्हापूरच्या राजकुंवर व समरजित इंगळे या भावंडांनी पदके मिळवीत कोल्हापूरच्या क्रीडावैभवात भर घातली आहे. १८ वर्षीय राजकुंवर हिने सीनिअर आणि ज्युनिअर अशा दोन्ही गटांत सुवर्णपदक पटकावले; तर याच स्पर्धेच्या डबल ट्रॅप प्रकारात समरजितने (वय १३) रौप्यपदक पटकावून आपली चुणूक दाखवली.

राजकुंवर व समरजित या भावंडांनी बालेवाडी क्रीडा संकुलातील प्रशिक्षक सिद्धार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. तसेच राजकुंवरने जयपूर व पतियाळा येथे जाऊन सराव केला आहे. तसेच तिने यापूर्वी डबल ट्रॅप या प्रकारात राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेतही पदक पटकाविले आहे. यासह जी. व्ही. मावळंकर अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेतही राजकुंवरने आपली चुणूक दाखविली आहे. ‘कोल्हापूरच्या राही सरनोबतप्रमाणे भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवून जागतिक स्थरावर पदक जिंकण्याची आपली महत्त्वाकांक्षा आहे,’ असे राजकुंवरने ‘सकाळ’शी बोलताना म्हटले आहे.

नेमबाजी हा तसा क्लिष्ट खेळ, त्यात पश्चिम महाराष्ट्रात सराव करण्यासाठी एकच शूटिंग रेज उपलब्ध आणि तीही आहे पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात. त्यामुळे जरी एखाद्या खेळाडूला या खेळाबद्दल आकर्षण वाटले तरी ते पुढे अपुऱ्या संसाधनांविना टिकणे तसे कठीण. त्यात आपल्या घरात पालकांनी हौस म्हणून ठेवलेल्या बंदुका, रायफल्स पाहून या भावंडांमध्ये लहानपणी नेमबाजीची आवड जडली. या आवडीला पुढे मोठा भाऊ पृथ्वीराज इंगळेमुळे व्यावसायिक दृष्टिकोन मिळाला.

''राजकुंवर व समरजित यांनी भविष्यात देशाच्या राष्ट्रीय नेमबाजी संघात स्थान मिळवून कोल्हापूरचे नाव मोठे करावे, अशी माझी इच्छा आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकमेव शूटिंग रेंज असल्याने मुलांना सरावासाठी पुण्यात यावे लागते; परंतु या सर्वांतही मुलांनी प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपली स्वप्ने पूर्ण करावीत, यासाठी आमचा पाठिंबा त्यांना कायम असणार आहे.''

- प्रणिल इंगळे, राजकुंवरचे वडील