लडाखचे क्रिकेटपटू जम्मू-काश्‍मीरकडूनच खेळतील : विनोद राय 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

नव्याने केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेल्या लडाखमधील क्रिकेटपटू देशांतर्गत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सध्यातरी जम्मू-काश्‍मीरकडून खेळू शकतील, अशी माहिती "बीसीसीआय'वरील प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी मंगळवारी दिली. 

नवी दिल्ली - नव्याने केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेल्या लडाखमधील क्रिकेटपटू देशांतर्गत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सध्यातरी जम्मू-काश्‍मीरकडून खेळू शकतील, अशी माहिती "बीसीसीआय'वरील प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी मंगळवारी दिली. 

केंद्र सरकारने सोमवारी जम्मू-काश्‍मीरचे विभाजन करून लडाख आणि जम्मू-काश्‍मीर अशी दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली; पण "बीसीसीआय' सध्यातरी कुठल्याही केंद्रशासित प्रदेशाला संलग्नत्व देऊ शकणार नाही. राय म्हणाले, ""सध्यातरी आम्ही लडाखला स्वतंत्र राज्य संघटनेचा दर्जा देण्याचा विचार करू शकत नाही. लडाखचे खेळाडू जम्मू-काश्‍मीरकडून "बीसीसीआय'च्या सर्व देशांतर्गत स्पर्धेत खेळू शकतात.'' 

रणजी करंडकाचा यंदाचा मोसम डिसेंबरपासून सुरू होत आहे. आजपर्यंत जम्मू-काश्‍मीर संघात लडाखचा एकही खेळाडू नाही. 

मताधिकाराचा प्रश्‍नच नाही 
लडाखला "बीसीसीआय'साठी पुद्दुचेरीप्रमाणे मतदानाचा अधिकार मिळणार का, असे विचारले असता, राय म्हणाले, ""मतदानाच्या अधिकाराचा येथे प्रश्‍नच येत नाही. अजून त्याबाबत चर्चादेखील झालेली नाही. सध्यातरी त्यांना चंडिगडप्रमाणेच सर्व फायदे मिळतील. चंडिगडदेखील केंद्रशासित प्रदेश असून, त्यांचे खेळाडू पंजाब किंवा हरियानाकडून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळतात. 

कलम 370 रद्द झाल्यामुळे जम्मू-काश्‍मीरला विशेष केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला असला, तरी "बीसीसीाय'च्या रचनेत काही फरक पडणार नाही. काश्‍मीर खोऱ्यातील क्रिकेट आधीप्रमाणेच सुरू राहील आणि त्यांचे घरच्या मैदानावरील सामने श्रीनगर येथे होतील. 
-विनोद राय, प्रशासक समिती अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ladakh players will play for Jammu and Kashmir for time being says vinod rai