पी.व्ही. सिंधू, लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पी.व्ही. सिंधू, लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत

पी.व्ही. सिंधू, लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत

बाली : भारताची दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि फॉर्मात असलेल्या लक्ष्य सेन यांनी मंगळवारी आपापल्या सामन्यांमध्ये विजय नोंदवून इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या सिंधूने ४३ मिनिटे चाललेल्या महिला एकेरीच्या लढतीत थायलंडच्या सुपानिदा कातेथोंगचा २१-१५, २१-१९ असा पराभव केला.

‘सुपर ३२’ च्या फेरीत जागतिक क्रमवारीत ३३ व्या स्थानी असलेल्या सुपानिदाविरुद्ध सिंधूने अत्यंत चांगली सुरुवात करत ११-५ अशी आघाडी घेतली. थायलंडच्या शटलरने नंतर संघर्ष करत १६-१३ असे गुण मिळवले, परंतु सिंधूने आपला अनुभव वापरून पहिला गेम २१-१५ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्येही सुपानिदाने कडवा संघर्ष दिला; मात्र सिंधूने २१-१९ अशी सरशी मिळवली. १६ व्या फेरीत विद्यमान विश्वविजेत्या सिंधूचा सामना आता जागतिक क्रमवारीत ४७ व्या स्थानी असलेल्या स्पेनच्या क्लारा अझुरमेंडीशी होणार आहे. अझुरमेंडीने पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या फित्रियानी फित्रियानीचा २१-१८, २१-१४ असा पराभव केला आहे.

लक्ष्य सेनने पहिल्या फेरीच्या पुरुष एकेरीतील लढतीत जागतिक क्रमवारीत १० व्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या कांता त्सुनेयामाचा पराभव केला. ‘हायलो ओपन सुपर ५००’ची उपांत्य आणि ‘डच ओपन’ची अंतिम फेरी गाठलेल्या लक्ष्यने एक तास आणि आठ मिनिटे चाललेल्या लढतीत कांतावर २१-१७, १८-२१, २१-१७ असा विजय मिळवला. पुढील फेरीत लक्ष्यचा सामना अव्वल मानांकित आणि दोन वेळचा विश्वविजेता जपानच्या केंटो मोमोटाशी होणार आहे.

loading image
go to top