esakal | यॉर्कर किंग लसीथ मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Lasith Malinga

श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि मुंबई इंडियन्सचे मानले आभार

यॉर्कर किंग लसीथ मलिंगाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

sakal_logo
By
विराज भागवत

यॉर्कर किंग वेगवान गोलंदाज लसीथ मलिंगा याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संपूर्ण निवृत्ती जाहीर केली. सर्वप्रथम त्याने कसोटी आणि वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण मंगळवारी त्याने आंतरराष्ट्रीय आणि लीग टी२० क्रिकेटमधूनही निवृत्ती घोषित केली. गेल्या वर्षी झालेल्या IPL लिलावाआधी मुंबई इंडियन्स संघाने वेगाचा बादशाह असलेल्या लसिथ मलिंगाला करारमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर, आज लसिथ मलिंगाने अधिकृतरित्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

मंगळवारी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने आपण स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. लसिथ मलिंगाने २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर २०१९मध्ये बांगलादेशविरूद्ध श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर शेवटचे षटक टाकून त्याने वन डे क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यानंतर श्रीलंकेच्या टी२० संघात त्याला विश्वचषकासाठी स्थान मिळावे अशी त्याची इच्छा होती. पण त्याला त्यात स्थान मिळाले नाही.

अखेर आज आपल्या युट्यूबवरून त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्याची घोषणा केली. आपल्या व्हिडीओमधून त्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे आभार मानले. तसेच, क्लब क्रिकेटमध्ये आपल्याला संधी देणाऱ्या मुंबई इंडियन्स, मेलबर्न स्टार्स आणि केंट क्रिकेट क्लबचेही त्याने आभार मानले.

१७ वर्षांच्या कारकिर्दीत मी खूप काही शिकलो. माझ्या अनुभवाचा माझ्या संघासाठी अनेकदा मला उपयोग करता आला याचा मला अभिमान आहे. पण आता मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पण निवृत्तीनंतरही मी कायम युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असेन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या साऱ्यांना धन्यवाद, अशा आशयाचा मेसेज देत त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट केला.

loading image
go to top