esakal | निसटत्या विजयासह लिव्हरपूलचीच आघाडी

बोलून बातमी शोधा

चेल्सीचा मॅसन माऊंट याचा मँचेस्टर सिटीविरुद्ध गोलचा प्रयत्न अपयशी ठरला.

मॅंचेस्टर सिटीने कडव्या झुंजीत चेल्सीचे आव्हान परतवले खरे, पण लिव्हरपूलने क्रिस्टल पॅलेसला कडव्या लढतीत पराजित करून आपली 12 गुणांची आघाडी राखली. लीस्टर सिटीने दुसरा क्रमांक कायम राखला.

निसटत्या विजयासह लिव्हरपूलचीच आघाडी
sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : मॅंचेस्टर सिटीने कडव्या झुंजीत चेल्सीचे आव्हान परतवले खरे, पण लिव्हरपूलने क्रिस्टल पॅलेसला कडव्या लढतीत पराजित करून आपली 12 गुणांची आघाडी राखली. लीस्टर सिटीने दुसरा क्रमांक कायम राखला.

सिटीने सुरुवातीच्या पिछाडीनंतर चेल्सीला 2-1 असे पराजित केले. रहीम स्टर्लिंगचा गोल व्हिडीओ रेफरलमध्ये फेटाळला गेला नसता तर सिटीला गोलफरक वाढवता आला असता. चेंडूवर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत कमी वर्चस्व राखल्यावरही सिटीने बाजी मारली. मात्र, सामना संपण्याच्या सुमारास सर्जीओ ऍग्युएरो याला झालेली दुखापत त्यांना सलत आहे.

अखेरच्या मिनिटात गोल करण्याची मालिका राखत लिव्हरपूलने 2-1 विजय मिळवला. त्यांनी 82 व्या मिनिटास बरोबरीचा गोल स्वीकारला होता. पण त्यांनी विजयी मालिका कायम राखली. त्यांनी या मोसमातील 13 पैकी 12 वी लढत जिंकली तसेच सलग 30 व्या प्रीमियर लीग लढतीत ते अपराजित आहेत. "खेळ कसा करावा, फुटबॉलचे कौशल्य काय आहे, हे दाखवण्याचे आमचे काम नाही. आमचे लक्ष्य विजयाचे असते, ते साध्य करीत आहोत,' असे लिव्हरपूलचे मार्गदर्शक जर्गन क्‍लॉप यांनी सुनावले. लीस्टरने उत्तरार्धातील दोन गोलच्या जोरावर ब्रायटनला 2-0 हरवले.

युव्हेंटिसची आघाडी कायम
रोम ः गोंझालो हिगुएन याच्या उत्तरार्धातील दोन गोलच्या जोरावर युव्हेंटिसने इटली फुटबॉल लीग अर्थात सिरी ए मध्ये ऍटलांटाचा 3-1 पाडाव केला. ख्रिस्तियानो रोनाल्डोची उणीव युव्हेंटिसने फारशी जाणवू दिली नाही. इंटर मिलानने तॉरीनोस 3-0 हरवून युव्हेंटिसवरील दडपण कायम ठेवले. युव्हेंटिस आणि इंटर मिलान यांच्यात एका गुणाचा फरक आहे.

बायर्नचा सफाईदार विजय
बर्लिन ः मार्गदर्शकाविना खेळणाऱ्या बायर्न म्युनिचने फॉर्च्युना ड्युसेलडोर्फला 4-0 असे पराजित केले. आघाडीवरील बोरुसिया मॉएनशेनग्लॅडबॅश युनियन बर्लिनविरुद्ध 0-2 पराजित झाल्याचा फायदा बायर्नला होईल. अंतरिम मार्गदर्शक हॅन्सी फ्लीक यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून बायर्नचा हा सलग तिसरा विजय आहे. टॉटनहॅमचे माजी मार्गदर्शक मॉरिसिओ पॉशेत्तिनो यांच्याकडे बायर्नची सूत्रे दिली जाणार याची समाजमाध्यमांवर चर्चा आहे, पण फ्लीक ख्रिसमसपर्यंत मार्गदर्शक असतील असे सांगण्यात आले.