रुद्राक्ष पाटीलचा सुवर्णनेम, दियाही अव्वल

रुद्राक्ष पाटीलचा सुवर्णनेम, दियाही अव्वल

मुंबई : ठाण्याच्या रुद्राक्ष पाटीलने खेलो इंडिया नेमबाजीतील महाराष्ट्राच्या मोहिमेस सुवर्ण सुरुवात केली. दिया चितळेने महाराष्ट्राच्याच स्वस्तिका घोषला पराजित करून 17 वर्षांखालील मुलींच्या टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. आदिती दांडेकरने जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राला अव्वल क्रमांक मिळवून दिला. ऍथलेटिक्‍सच्या रिलेत राज्याचा संघ सुवर्णभरारी घेत असताना मराठमोळ्या कबड्डीत मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

रुद्राक्षने 14 वर्षांखालील गटातील प्राथमिक फेरीतील वर्चस्व अंतिम फेरीत जास्त भक्कम केले. त्याने 252.4 गुणांनी बाजी मारताना अन्य प्रतिस्पर्ध्यांना किमान दोन गुणांनी मागे टाकले. शाहू मानेला 21 वर्षांखालील गटात ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. प्राथमिक फेरीतील अपयशानंतर त्याने अंतिम फेरीत कामगिरी उंचावली, पण अखेरचे तिघे स्पर्धक असताना शाहू शूटआऊटमध्ये मागे पडला.

हरियाणाकडून निष्प्रभ
राज्याचा 21 वर्षांखालील मुलांचा कबड्डी संघ हरियाणाविरुद्धच्या अंतिम सामन्यात 27-41 असा एकतर्फी लढतीत पराजित झाला. पंकज मोहिते आणि अस्लम इनामदारच्या चढायांना बचावाची साथच लाभली नाही. कोपरारक्षक सौरभ नागलने मोक्‍याच्या वेळी पकडी करीत महाराष्ट्राच्या आक्रमणास मर्यादा घातल्या. तीन लोण स्वीकारलेल्या महाराष्ट्राने चढाईत 17 आणि पकडीत 20 गुण गमावले.

रिलेत सुवर्ण धाव
प्रांजली पाटील, श्रेया शेडगे, सुदेष्णा शिवणकर, सृष्टी शेट्टी यांनी 17 वर्षांखालील मुलींच्या गटातील 4 बाय 100 मीटर रिले शर्यत जिंकली. त्यांनी 48.36 सेकंद वेळ दिली. 21 वर्षांखालील गटातील रिलेत राज्याच्या मुलांचा तसेच मुलींचा संघ ब्रॉंझच जिंकू शकला. त्याचबरोबर निधी सिंग (400 मीटर), दुर्गा देवरे (800 मीटर) आणि चैतन्य होलगारे (800 मीटर) यांनी 21 वर्षांखालील वयोगटात ब्रॉंझ जिंकले.

ज्युदोत पदकाची लूटच
ज्युदोतही पदकांची कमाई कायम आहे. शुभांगी राऊत (मुंबई, 21 वर्षांखालील- 57 किलो), प्रथम गुरव (मुंबई, 21 वर्षांखालील- 55 किलो) आणि निशांत गुरव (कोल्हापूर, 21 वर्षांखालील- 73 किलो) यांनी रौप्यपदक पटकावले; तर 21 वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीची राणी खोमणे (48 किलो), स्नेहल खावरे (52 किलो) तसेच कराडची रोहिणी मोहिते (44 किलो) ब्रॉंझपदक मिळवले.

शुभम - चिन्मय विजेते
दियाने टेबल टेनिसच्या निर्णायक लढतीत स्वस्तिकचा 4-3 पाडाव केला. दियाला 3-1 पिछाडीनंतर बरोबरी स्वीकारावी लागली होती, पण तिने निर्णायक गेम जादा गुणांवर जिंकला. दरम्यान, शुभम आम्रे व चिन्मय सोमया यांनी 21 वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत बाजी मारली. त्यांनी अंतिम फेरीत हरयाणाच्या जीत चंद्रा व वेस्ली दो रोझारिओ यांचा 4-0 असा पाडाव केला.

आदितीची सरशी
जिम्नॅस्टिकमध्ये आदिती दांडेकरने तालबद्ध प्रकारात सुवर्णपदक जिंकताना 62.95 गुण मिळवले होते. याच प्रकारात रिचा चोरडियाने (47) ब्रॉंझ जिंकले. दरम्यान, 21 वर्षांखालील मुलांच्या कलात्मकच्या फ्लोअर एक्‍सरसाईजमध्ये अनस शेख (120) याने ब्रॉंझ मिळवले.

तिरंदाजीत पाच पदके
दिशा संचेती आणि सचिन वेदवान तिरंदाजीतील 21 वर्षांखालील गटाच्या रिकर्व्ह प्रकारातील अंतिम फेरीत पराजित झाले. दोघेही निर्णायक लढतीत 4-6 पराजित झाले. याच गटातील ब्रॉंझ पदकाची लढत मयूर रोकडेने गमावली. ईशा पवार (कम्पाऊंड), पार्थ साळुंके, साक्षी तोटे (रिकर्व्ह) यांनी ब्रॉंझ पदकाची लढत जिंकली.

हॉकीत विजयी सलामी
राज्याच्या हॉकी संघाने 21 वर्षांखालील मुलींच्या गटात विजयी सलामी देताना बलाढ्य झारखंडला 1-0 असे हरवले, पण 17 वर्षांखालील मुलींच्या गटात राज्याचा संघ झारखंडविरुद्ध 2-8 असा पराजित झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com