esakal | महाराष्ट्र केसरी 2020 : ऊसतोड कामगारपुत्र नितीनला सुवर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र केसरी 2020 : ऊसतोड कामगारपुत्र नितीनला सुवर्ण

ऊसतोड कामगाराचा मुलगा नितीन पांडुरंग पोवार याने महाराष्ट्र केसरीचे मैदान गाजवताना ७० किलो माती गटात आज सुवर्णपदक पटकाविण्याची किमया साधली.

महाराष्ट्र केसरी 2020 : ऊसतोड कामगारपुत्र नितीनला सुवर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ऊसतोड कामगाराचा मुलगा नितीन पांडुरंग पोवार याने महाराष्ट्र केसरीचे मैदान गाजवताना ७० किलो माती गटात आज सुवर्णपदक पटकाविण्याची किमया साधली. त्याचा जुळा भाऊ नीलेशला ७९ किलो मॅट विभागात ब्राँझ पदकाने हुलकावणी दिली असली तरी, नितीनच्या यशाने मोतीबाग तालमीच्या नावावर सुवर्णपदकाची मोहोर उमटली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘रुस्तुम-ए-हिंद’ दादू चौगले यांना पदक अर्पण करून त्याने श्री. चौगले यांच्या वस्तादी कारकिर्दीला सलाम केला. नितीन (वाकरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी आहे. गावातल्या ज्योतिर्लिंग तालमीत त्यांनी कुस्तीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. मोतीबाग तालमीत चौगले यांच्याकडे त्याने कुस्तीचे डावपेच अंगात मुरवले. महाराष्ट्र केसरीच्या मैदानात तो २०१० ला ५७ किलो माती गटात खेळला होता. त्याने ब्राँझ पदकाची कमाई केली होती. गावोगावच्या मैदानात त्याचा करिष्मा राहिला. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती मैदान ७९ किलो विभागात त्याने स्वतःला आजमाविण्याचे ठरवले होते. त्यासाठी कसून मेहनत घेतली होती. त्याची लढत तालमीतल्याच मच्छिंद्र बाळासाहेब निऊंगरेविरुद्ध झाली. त्यात त्याने एका गुणाने मच्छिंद्रवर मात करत सुवर्णपदक पटकावले.

नितीन कळे (ता. पन्हाळा) येथील विठ्ठल पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो बी.ए.च्या पहिल्या वर्षात शिकत आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी कुस्तीला रामराम ठोकलेला नाही. त्याचा जुळा भाऊ नीलेश पोवार याच्यासोबत तो कुस्तीचा सराव करतो. त्याचे वडील पांडुरंग पोवार ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. घरच्या एकरभर शेतात राबतात. यंदाच्या अतिवृष्टीत त्यांचे साध्या मातीचे घर पडले. त्यामुळे ते आता पोवारवाडीतील शेतातल्या घरात राहतात.

मोतीबागला दोन पदके
७० किलो माती गटातील अंतिम लढत मोतीबाग तालमीचा नितीन विरुद्ध मच्छिंद्र यांच्यात झाली. नितीनने सुवर्ण, तर मच्छिंद्रने रौप्यपदक मिळवून तालमीच्या नावावर दोन पदके केली. त्यांना वस्ताद अशोक माने, प्रशिक्षक प्रवीण कोंडावळे, कृष्णात पाटील, कोल्हापूर जिल्हा शहर व राष्ट्रीय तालीम संघाचे वस्ताद बाळ गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले.

मराठा लाइट इन्फंट्रीचा मल्ल
मच्छिंद्र हा साके (ता. कागल) येथील आहे. तो मोतीबागेत २००६ला प्रशिक्षणासाठी दाखल झाला. तत्पूर्वी तो गावातल्या भैरवनाथ आखाड्यात सराव करायचा. शहाजी छत्रपती महाविद्यालयातून तो कला शाखेचा पदवीधर आहे. शाहू साखर कारखान्याचा तो पाच वर्षे दत्तक मल्ल होता. सध्या तो बेळगाव मराठा लाइट इन्फंट्रीत आहे.

महाराष्ट्र केसरी 2020