
Maharashtra Kesari : विजेत्या पैलवानाला यंदा 'महिंद्रा थार' तर उपविजेता बुलेटचा मानकरी
Maharashtra Kesari : दोन गटांतील वादानंतर अखेर महाराष्ट्र केसरी या राज्यातील मानाच्या कुस्ती स्पर्धेला मुहूर्त सापडला. पुण्यातील कोथरुड येथे २०२३ मधील १० ते १४ जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा रंगणार असून राज्यातील ८०० कुस्तीपटू माती व गादी अशा दोन विभागांत सर्वस्व पणाला लावणार आहेत. या स्पर्धेमध्ये विजेत्यांवर मोठ्या बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला मानाच्या गदेसोबत महिंद्रा थार ही चारचाकी गाडी व पाच लाख रोख रक्कम बक्षिसाच्या रूपात दिली जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनातील सदस्य संजय शेटे यांनी दैनिक सकाळशी बोलताना दिली.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची अस्थायी समिती, पुणे शहर तालीम संघ व संस्कृती प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र केसरीत विजेत्या होणाऱ्या कुस्तीपटूच्या बक्षिसासाठी प्रायोजक मिळाले आहेत. आता उपविजेता ठरणाऱ्या कुस्तीपटूच्या बक्षिसासाठीही प्रायोजक शोधण्यात येत आहेत. सध्या उपविजेत्याला अडीच लाख रुपये बक्षिसाच्या रूपात देण्यात येणार आहेत. शिवाय बुलेट बाईकही देण्यात येणार आहे. त्याला महिंद्रा थार ही चार चाकी गाडी देण्यात यावी यासाठी प्रायोजक शोधण्यात येत आहेत. एवढेच नव्हे, तर गटातील विजेत्यांना मोटार बाईक देण्यात येणार आहे, असे संजय शेटे यांनी पुढे स्पष्ट केले. ही स्पर्धा कुस्तीपटू व कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरू शकते.
७० हजार कुस्तीप्रेमी लढतींचा आनंद घेतील
महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. पुण्यामध्ये ७० हजार कुस्तीप्रेमी बसून लढतींचा आनंद घेऊ शकतील अशी तयारी केली जात आहे. याशिवाय राज्यभरातून येणारे कुस्तीपटू, संलग्न जिल्ह्यांतील प्रतिनिधी, सहायक स्टाफ या सर्वांच्याच राहण्याची, खाण्याची सर्व व्यवस्था नीटनेटकेप्रमाणे करण्यात येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी व दणक्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही संजय शेटे यांनी याप्रसंगी सांगितले.
दोन गटांतील वादाबाबत संजय शेटे यांना विचारले असता ते म्हणाले, राष्ट्रीय कुस्ती संघटनेकडून जुन्या कार्यकारिणीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. तसेच शरद पवार, बृजभूषण सिंग व रामदास तडस यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र केसरी ही एकच स्पर्धा घेण्याचे ठरवण्यात आले. दोन केसरी स्पर्धा खेळवण्यात येऊ नये असे त्यामध्ये ठरले. त्यामुळे पुण्यातील स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला.
अनुदानासाठी मागणी
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला महाराष्ट्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठीही मागणी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेल्या कुस्तीपटूंना पुढील वर्षभर (पुढील स्पर्धा होईपर्यंत) विशिष्ट रक्कम दिली जाते. ही रक्कम दुप्पट करण्यात यावी यासाठीही मागणी करण्यात आल्याचे संजय शेटे यांनी या वेळी म्हटले आहे.