‘महाराष्ट्र केसरी’ मैदान अधिकृत कोणाचे? ; पैलवानांचा प्रश्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Kesari wrestling tournament

‘महाराष्ट्र केसरी’ मैदान अधिकृत कोणाचे? ; पैलवानांचा प्रश्‍न

कोल्हापूर : ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा नेमकी अधिकृतपणे कोणाची, असा प्रश्‍न पैलवानांना पडला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्यावर अस्थायी समितीची स्थापना झाली. या समितीने स्पर्धेची घोषणा केली आहे. आता पुन्हा राज्य कुस्तीगीर परिषदेने स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याने पैलवानांच्या संभ्रमात अधिकच भर पडली.

अस्थायी समितीतर्फे आणि पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघ यांच्या सहकार्याने व पैलवान मुरलीधर मोहोळ संस्कृती प्रतिष्ठानतर्फे ६५ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद व ‘महाराष्ट्र केसरी’ किताब स्पर्धा १५ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान कोथरूड (पुणे) येथे होत आहे. त्यासाठी शहर, जिल्हा कुस्तीगीर, तालिम संघांच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा ३० नोव्हेंबर २०२२ पूर्वी घेण्यात याव्यात, असे कळविण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष संजयकुमार सिंग यांनी तशी घोषणा केली आहे.

राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र केसरी २०२२-२३ व वरिष्ठ राज्य अजिंक्यपद गादी व माती कुस्ती स्पर्धा व वरिष्ठ ग्रीको रोमन, कुमार, महिला व युवा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

या पत्रकामुळे नेमक्या कोणत्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरायचे, अशी विचारणा पैलवानांतून होऊ लागली आहे. राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त झाल्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले आहे. महासंघाने अस्थायी समिती स्थापन केली आहे. या स्थितीत राज्य कुस्तीगीर परिषदही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यास सरसावली आहे.

सत्तर वर्षांपासून परिषद ही स्पर्धा घेत आहे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा कुस्तीचा वारसा जोपासत आहे. परिषदेला स्पर्धा घेण्याचा अधिकार आहे. लवकरच वेळापत्रक जाहीर करू.

- बाळासाहेब लांडगे, सचिव, राज्य कुस्तीगीर परिषद

कुस्तीगीर परिषदेकडून या स्पर्धेचे आयोजन करणे चुकीचे आहे. परिषद बरखास्त झाली असून, अस्थायी समितीला स्पर्धेचा अधिकार आहे.

- विनोद तोमर, सचिव, भारतीय कुस्ती महासंघ