Maharashtra State School Chess Championship 2026
मुंबई, ६ नोव्हेंबर : अत्यंत चुरशीच्या डावपेचांनी रंगलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सहा गटांना सहा नवे विजेते मिळाले. इवान दुबे, लिया कृष्णन, कौशिक अजिंक्य रायते, त्वेषा आशिष जैन, संविद पासबोला आणि खनक पहारिया यांनी आपापल्या गटांत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अजिंक्यपदावर कब्जा केला. यामध्ये इवान दुबेने सातही फेऱ्यांत विजय मिळवत शंभर टक्के गुणांची कमाई केली आणि स्पर्धेतील सर्वाधिक प्रभावी कामगिरीची नोंद केली. या स्पर्धेतील निकालाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या नियमानुसार, सहाही गटांतील पहिल्या दोन क्रमांकांच्या खेळाडूंना आगामी राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.