
खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सलग तिसरा दिवस महाराष्ट्रासाठी सुवर्णमय ठरला. आर्चरीत आदिल अन्सारी, नेमबाजीत सागर कातळेने अव्वल यश संपादून गोल्डन संडे साजरा केला. आर्चरीत राजश्री राठोडने, पॉवरलिफ्टिंगमध्ये शुक्ला बीडकर, सोनम पाटीलने रौप्य पदके जिंकून दिवस गाजविला.
जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरात सुरू असलेल्या आर्चरीत स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या आदिल अन्सारीने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पुरूषाच्या डब्ल्यू 1 प्रकारात सलग दुसर्या स्पर्धेत आदिलने सोनेरी यशाचा वेध घेतला. अंतिम फेरीत हरियाणाच्या नवीन दलालविरूध्द आदिलची सुरूवात खराब झाली होती. पहिल्या दोन फेर्यात पिछाडीवर असताना अंतिम फेरीत अचुक नेमबाजी करीत आदिलने सुवर्ण पदक खेचून आणले. 123 गुणांसह अवघा दोन गुणांनी आदिलने अव्वल यश संपादले. हरियाणाच्या दलाल यांना 121 गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.