मालविकाला अखिल भारतीय वरिष्ठ गट मानांकन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

नागपूरची युवा बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड हिने कोझीकोडे (केरळ) येथे रविवारी पार पडलेल्या अखिल भारतीय वरिष्ठ गट मानांकन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मालविकाचे वरिष्ठ गटातील हे दुसरे विजेतेपद होय

नागपूर : नागपूरची युवा बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड हिने कोझीकोडे (केरळ) येथे रविवारी पार पडलेल्या अखिल भारतीय वरिष्ठ गट मानांकन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मालविकाचे वरिष्ठ गटातील हे दुसरे विजेतेपद होय. 

विजेतेपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत 14 व्या मानांकित मालविकाने बिगर मानांकित महाराष्ट्राच्या पुर्वा बर्वेला सरळ दोन गेम्समध्ये 21-19, 23-21 ने पराभूत केले. जवळपास पाऊण तास रंगलेल्या या निर्णायक सामन्यात डावखुऱ्या मालविकाला विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. पहिला गेम 21-19 असा अवघ्या दोन गुणांनी जिंकल्यानंतर मालविकाने दुसरा गेमही चांगलाच रंगला. अखेर 23-21 अशी सरशी साधत मालविकाने गेम व सामना खिशात टाकला. माजी ऑलिम्पिकपटू निखिल कानेटकर यांच्या मार्गदर्शनात सराव करणाऱ्या पुर्वाविरुद्‌ध मालविकाने आतापर्यंत पाचवेळा बाजी मारली आहे. 

जयेंद्र ढोले यांच्या मार्गदर्शनात सराव करणाऱ्या मालविकाचे वरिष्ठ गटातील हे दुसरे, तर एकूण आठवे विजेतेपद होय. तिने गतवर्षी बरेली येथील स्पर्धेत नागपूरच्याच वैष्णवी भालेला पराभूत करून वरिष्ठ गटात पहिल्यांदा अजिंक्‍यपद मिळविले होते. शिवाजी विज्ञान महाविद्‌यालयाची विद्‌यार्थिनी असलेली मालविका दोन दिवसानंतर बंगळूर येथे होणाऱ्या आणखी एका राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. 

"या स्पर्धेत पुर्वाने अनेक दर्जेदार खेळाडूंना पराभूत केल्याने सामना "टफ' होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात घडलेही तेच. दोन्ही गेम्समध्ये तिने कडवी झुंज दिली. यापूर्वी पुर्वाला अनेकवेळा पराभूत केल्याने तिच्या खेळाची मला कल्पना होती. त्यानुसार "स्ट्रॅटेजी' आखून खेळ केला. विजेतेपदाचा मनापासून खुप आनंद झाला.' 

-मालविका बन्सोड, बॅडमिंटनपटू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malvika wins Akhil Bhartiya Badmintion Championship