esakal | भारत-आफ्रिका दुसरी वन-डे आज 
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli MS Dhoni

भारत-आफ्रिका दुसरी वन-डे आज 

sakal_logo
By
सुनंदन लेले

सेंच्युरियन : भारताविरुद्ध दुसऱ्या सामन्याच्या तयारीत मोठा धक्का यजमान दक्षिण आफ्रिका संघाला बसला आहे. कर्णधार फाफ डूप्लेसीच्या अनुपस्थितीत फिरकीला रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

पहिल्या सामन्यात फाफचे बोट विराटने मारलेला चेंडू अडविताना दुखावले. फाफला उर्वरित मालिकेला मुकावे लागणार आहे. दरम्यान डर्बनला झालेल्या पहिल्या सामन्यात विराटने ठोकलेले शतक आणि त्याने अजिंक्‍य रहाणेसोबत केलेली मोठी भागीदारी हे विजयाचे कारण भारतीय पाठीराखे धरत असले तरी दक्षिण आफ्रिकेचे संघ व्यवस्थापन पराभवाचे मुख्य कारण भारतीय फिरकी गोलंदाजी समजत आहेत.

युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवने मिळून 5 फलंदाजांना चकवून बाद केले. याचा गांभीर्याने विचार दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक करत आहेत. ओटीस गिब्सन यांच्या मार्गदर्शनाखाली फिरकीला रोखण्याची ठोस योजना तयार केली जात आहे. 

यजमान संघाने भारतीय फिरकी गोलंदाजांच्या घेतलेल्या भीतीला आकडे कारण आहेत. चहल आणि कुलदीपने मिळून 20 षटके टाकली ज्यात फक्त 79 धावा फलंदाजांना काढता आल्या. पाच मुख्य फलंदाज याच दोघांनी बाद केले, तसेच दोघांनी मिळून तब्बल 64 चेंडूंवर एकही धाव घेऊ दिली नाही. भारतीय संघ विकेट कशाही असल्या तरी या दोन फिरकी गोलंदाजांना संघात जागा देणार हे उघड आहे. हे दोघेही मनगटाचा वापर करून गोलंदाजी करणारे असल्याने विकेट कितीही फलंदाजीला पोषक असली तरी हे दोघे काही ना काही मदत मिळवण्यात वाकबगार आहेत. 

पहिल्या सामन्यातील विजयाने भारतीय संघात चैतन्य आले आहे. वन-डे संघातील त्रुटी भरून काढण्याच्या प्रयत्नांना यश आले. रहाणेच्या सुंदर खेळीने मधल्या फळीतील फलंदाजीच्या मोठ्या समस्येवर एक सक्षम पर्याय सापडल्याचे संघ व्यवस्थापनाने 'सकाळ'शी बोलताना मान्य केले. 

एबी डिव्हिलीयर्स आणि आता फाफ यांच्या गैरहजेरीत संघाची धुरा सांभाळण्याची तारेवरची कसरत एडन मार्करमला करावी लागणार आहे. दुसऱ्या सामन्याकरिता सेंच्युरियनची विकेट बनवताना यजमान संघ कसेही करून भारतीय फिरकीला फायदा होणार नाही अशीच विकेट तयार करायचा आग्रह धरणार. एका पराभवानंतर दक्षिण आफ्रिकन संघात मोठे बदल व्हायची शक्‍यता बदली कर्णधार मार्करमने नाकारली. 

''आमच्या फलंदाजांनी फिरकीला खेळताना केलेल्या चुका दुसऱ्या सामन्यात दुरुस्त केल्या जातील. दुसरा सामना दिवसा खेळला जाणार असल्याने रात्री पडणाऱ्या दवाचा फायदा किंवा तोटा दोनही संघाला सहन करावा लागणार नाही,'' असे मार्करम म्हणाला. डर्बन सामन्यात भारतीय फलंदाजीला दुसरा डाव खेळताना झालेल्या फायद्याची वाच्यता न करता त्याने हळूच मुद्दा मांडला. 

सेंच्युरियन मैदानावर गेल्या 5-7 सामन्यांत 300च्या पुढची धावसंख्या पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाने केली आहे. डिव्हिलीयर्स आणि फाफच्या गैरहजेरीत आपला संघ कसा तग धरणार हे बघायला प्रेक्षक गर्दी करतील.

loading image
go to top