उत्तेजक द्रव्याच्या चाचण्या टाळण्यासाठीच रोख बक्षिसांच्या स्पर्धांत सहभाग 

residentional photo
residentional photo

नाशिक ः धावपटू संजीवनी जाधव उत्तेजक द्रव्य सेवनाच्या चाचणीत सापडल्याने नाशिकच्या इतर धावपटूंबद्दलही भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने माहिती घेण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेपूर्वी भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघातर्फे होणाऱ्या उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत सहभागी होण्यापेक्षा ती टाळण्यालाच नाशिकच्या धावपटूंनी प्राधान्य दिलेले आढळले. फक्त महाराष्ट्रात आणि भारतात होणाऱ्या रोख रकमेच्या (बक्षिसांच्या) स्पर्धांतच हे धावपटू सहभागी होऊन आपली चमक दाखवतात व बक्षिसांच्या रूपाने पैसा कमावतात, असेही निरीक्षण महासंघाने नोंदविले आहे. 
स्पर्धा मग ती मुंबई स्टॅन्डर्ड चार्टर्ड, ठाणे, पुणे, दिल्ली, गुजरात, पाटणा मॅरेथॉन असो की नाशिक रन, अशा या धावण्याच्या सर्व रोख बक्षिसांच्या स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंचा दबदबा राहिला आहे. किंबहुना नाशिकच्या धावपटूंचा सहभाग असेल तर त्यांच्या कामगिरीकडेच सर्वांचे लक्ष लागलेले असते. मग अगदी राज्य, राष्ट्रीय स्पर्धा गाजविणाऱ्या कविता राऊतपासून तर संजीवनी जाधव, मोनिका आथरे, ताई बाम्हणे, दुर्गा देवरे आणि कालच आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या आरती पाटीलपर्यंत साऱ्यांचेच यश नाशिककरांना हवेहवेसे असेच असते. बक्षीस, मदतीच्या रूपाने मिळणाऱ्या रकमेचा वापर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी होत असला, तरी उत्तेजक द्रव्यसेवन करून यश नोंदविणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी उपस्थित केला. 
ऍथलिट महासंघाचे राज्य समन्वयक राजीव जोशी म्हणाले, की नाशिककरांची ऍथलेटिक्‍समधील आतापर्यंतची कामगिरी निश्‍चित कौतुकास्पद राहिली आहे. पण फेडरेशनच्या निवड चाचणीत सहभागी न होता हे धावपटू फक्त रोख बक्षिसांच्या स्पर्धेतच का सहभागी होतात, हे कोडेच होते. नाशिकच्या धावपटूंनी यापूर्वी नोंदविलेल्या आतापर्यंतच्या सर्व कामगिरीची महासंघाने दखल घेतली असून, विशेष समितीद्वारे कागदपत्रे व अन्य बाबी तपासण्यात येतील. ज्येष्ठ संघटक दीपक बागूल म्हणाले, की उत्तेजक द्रव्य सेवनाच्या घटनांमुळे क्रीडाक्षेत्र बदनाम होते. खेळाडूंनी आपले, प्रशिक्षक व जिल्ह्याचे नाव बदनाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. संजीवनीच्या घटनेनंतर इतर क्रीडाप्रकारांत अस्वस्थता पसरली आहे. 

शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी वापर 

उत्तेजक द्रव्य चाचणीचे अभ्यासक आणि भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे उपाध्यक्ष (आयबीबीएफ) डॉ. दीपक सोनवणी "सकाळ'शी बोलताना म्हणाले, की धावपटू, क्रिकेटपटू, सायकलिंगपटू यांबरोबरच शरीरसौष्ठवमध्ये उत्तेजक द्रव्य सेवनाचे प्रमाण वाढले आहे. ऍनाबोलिक स्ट्रिराइडच्या चार प्रकारांत याचे वर्गीकरण करता येईल. आजकाल ऍथलेटिक्‍मध्ये "नेट टू नेक' स्पर्धा आहे. काही गुणांच्या(पॉइंट)च्या फरकाने पदकाला हुलकावणी दिली जाते. त्यामुळे धावपटू वेळ कमी लागणे आणि धावण्याची गती अधिक होणे, थकवा न जाणवणे, शरीर तंदुरुस्तीसाठी अशा उत्तेजक द्रव्याचे सेवन करतात. या औषधामुळे मेंदू उत्तेजित होतो. किंबहुना सर्दीसाठी ऍफोर्डियन नावाचे औषध घेतले, तरी चाचणीत धावपटू दोषी ठरू शकतो. "वाडा' आणि "नाडा'कडे आजकाल प्रभावी यंत्रणा आहे. त्यामुळे घेतलेले औषध लपविण्यासाठी घेतले जाणारे दुसरे औषध (मास्किंग ड्रग्ज) सेवन केले, तरी लगेचच खेळाडू पकडला जातो. धावपटूंना लागलेली सवय ही घातकच आहे. अलीकडे सर्वच क्रीडाप्रकारांत अशा औषधांचा वापर होऊ लागला आहे, पण त्याबद्दल डॉक्‍टर, मार्गदर्शकांशी वेळोवेळी चर्चा व्हायला हवी, असे वाटते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com