फिटेस्ट फेडरर! (अग्रलेख)

Roger Federer
Roger Federer

तारुण्याचा जोश प्रभावी ठरतो की अनुभव? एकाचे वय होते 35 वर्षे 312 दिवस आणि समोर होता 28 वर्षांचा खेळाडू. रविवारी संध्याकाळी इंग्लंडच्या राजधानीतील विंबल्डन येथील ऑल इंग्लंड क्‍लबमध्ये 1877 पासून दरवर्षी नित्यनेमाने होणाऱ्या स्पर्धेतील या अंतिम सामन्याकडे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेले होते. झुंज चुरशीची होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात अनुभवापुढे मारिन चिलीचचा तारुण्याचा जोश कमी पडला आणि रॉजर फेडरर नावाच्या जगद्विख्यात टेनिसपटूने आठव्यांदा विंबल्डन चषक जिंकला!

पण केवळ अनुभव नव्हे; फेडररसारख्या खेळाडूंच्या यशाचं रहस्य हे त्यांच्या तंदुरुस्तीत असते. पुढे जाणाऱ्या वयाला आपल्यावर स्वार होऊ न देता तंदुरुस्त राहण्यात फेडररने कमाल केली आहे. ती त्याच्या पदलालित्यात दिसली आणि समोरच्याला अक्षरशः निरुत्तर करणाऱ्या त्याच्या सुपर सर्व्हिसमध्येही. त्यातील भेदकता तसूभरही कमी होऊ न देण्यात तो यशस्वी झाला आहे. तंदुरुस्ती टिकविण्यासाठी नित्यनेमाने केलेले परिश्रमच कामी येतात आणि त्यांनीच फेडररला भरभरून दिले आहे. महिलांच्या सामन्यात मात्र 37 वर्षीय अनुभवी महिला टेनिसपटूवर मात करीत अवघ्या 23 वर्षीय गार्बीन मुगुरुझाने विजय मिळविला.

तारुण्याचा जोश प्रभावी ठरतो की अनुभव, या प्रश्‍नाचे उत्तर देणे कठीण असले तरी एक नक्की, की तंदुरुस्ती आणि कौशल्य प्रभावी असते. फेडरर अप्रतिम खेळला. त्याने सरळ तीन सेट जिंकून विजय मिळवला, यात नवल नव्हते; कारण या सामन्यातच नव्हे तर यंदाच्या प्रतिष्ठेच्या विंबल्डन स्पर्धेत त्याने एकही सेट न गमावण्याचा विक्रम केला होता! शिवाय, राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच तसेच विंबल्डन स्पर्धेत प्रथम मानांकन मिळवणारा ऍण्डी मरे हे तिघेही मातब्बर खेळाडू स्पर्धेतून आधीच बाद झाले होते. त्यामुळे खरे तर फेडररला तुल्यबळ प्रतिस्पर्धीच उरला नव्हता. मुगुरुझाचे मात्र तसे नव्हते. तिच्यापुढे टेनिसविश्‍वावर आपल्या अद्‌भुत खेळामुळे प्रदीर्घ काळ ठसा उमटवणाऱ्या विल्यम्स भगिनींपैकी अधिक अनुभवी व्हीनस होती. तरीही मुगुरुझाने तिच्यावर मात केली. यंदाची विंबल्डन स्पर्धा अविस्मरणीय ठरली ती निकालांबाबतच्या या अनिश्‍चिततेमुळेच! 

जगभरातील टेनिसप्रेमींसाठी कायम आठवणीत राहणाऱ्या अमेरिकन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि विंबल्डन या तीन स्पर्धांपैकी विंबल्डन ही सर्वांत प्रतिष्ठेची आणि अटीतटीची स्पर्धा. एक तर ही स्पर्धा 'ग्रास कोर्ट'वर खेळली जात असल्यामुळे येथे अनिश्‍चिततेला तसेच शारीरिक तंदुरुस्तीला अधिक वाव असतो आणि त्यामुळेच शेवटच्या सेटपर्यंतच नव्हे तर शेवटच्या गेमपर्यंत स्पर्धा अविस्मरणीय ठरते. फेडररने ही स्पर्धा यंदा आठव्यांदा जिंकली आणि तो या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोचणारा वयाने सर्वाधिक मोठा खेळाडू ठरला. या आधी 1975 मध्ये आर्थर ऍशने जिमी कॉर्नर्सला पराभूत करून सोनेरी झळाळी असलेला विंबल्डनचा प्रतिष्ठेचा चषक मिरवला तेव्हा तो 31 वर्षांचा होता. मात्र 'ग्रॅण्ड स्लॅम' हा किताब जिंकणारा मात्र तो वयाने सर्वाधिक मोठा खेळाडू नाही. 1972 मध्ये केन रोझवालने मानाची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली तेव्हा त्याचे वयोमान अवघे 37 होते! अर्थात आजमितीला फेडरर ज्या पद्धतीने खेळत आहे, ते बघितले की रोझवालचा हा विक्रमही तो सहज मोडू शकेल, असे म्हणता येते. महिला अजिंक्‍यपदाच्या अंतिम सामन्यातही नेमके हेच घडले. या अंतिम सामन्यापर्यंत पोचणारी व्हीनस विल्यम्स भले या सामन्यात पराभूत झाली असेल; पण अंतिम खेळीपर्यंत पोचणारी ती 37 वर्षांची सर्वात 'ज्येष्ठ' तरुणी ठरली! यंदाच्या विंबल्डन स्पर्धेत उतरताना व्हीनसवर तिच्या हातून अलीकडेच घडलेल्या एका दुर्देवी अपघाताचे सावट होते. फ्लोरिडात ती गाडी चालवत असताना झालेल्या त्या अपघातात 87 वर्षांचा एक इसम मृत्युमुखी पडला होता. मात्र, त्यातून सावरत तिने जिद्दीने या स्पर्धेत अंतिम फेरी गाठलीच. 

विंबल्डन स्पर्धेला केवळ टेनिसविश्‍वातच नव्हे, तर साऱ्या क्रीडाविश्‍वात इतके महत्त्व प्राप्त होण्याची कारणेही अनेक आहेत. एक तर 1877 पासून ही स्पर्धा अव्याहतपणे सुरू आहे आणि तीही मोठ्या शिस्तीने. रंगबिरंगी कपड्यांची चमकधमक येथे चालत नाही. पांढऱ्या शुभ्र वेषातील खेळाडूंचे या स्पर्धेतील अटीतटीचे सामने हे डोळ्यांना कमालीचा सुखद अनुभव देऊन जातात. मात्र, त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे ही स्पर्धा जिंकण्यासाठी खेळाडू आपली सारी उमेद आणि जिद्द पणाला लावतात आणि मोठ्या ईर्षेने खेळतात. फेडररने नेमके हेच केले. पहिला गेम खरे तर त्याने गमावला होता; मात्र त्यामुळे आपली उमेद तो हरवून बसला नाही. गार्बीन मुगुरुझानेही नेमके तेच केले. व्हीनसबरोबर तिची सुरवात मोठ्या चुरशीची झाली. मात्र, पुढे तिने सलग नऊ गेम जिंकले आणि विजयश्री खेचून आणली. तंदुरुस्ती आणि खेळाची प्रतिभा यांनाच विंबल्डनची तृणपाती सलाम करतात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com