
हॅमिल्टन : न्युझीलंड दौर्यावर आल्यापासून भारतीय संघाचे सर्व फासे बरोबर पडले आहेत. दोन सामन्यात भारतीय संघाने क्रिकेटच्या सर्व प्रांतात सरस खेळ करून दाखवला आहे. ‘‘जसप्रीत बुमराची लय पुढच्या तीन सामन्यात हरवली तरच आम्ही जिंकू शकतो’’, मार्टीन गुप्टील हताश चेहर्याने म्हणू लागला तेव्हा वाटले की यजमान संघाला समजत नाहीये की विराट सेनेला शह द्यायला नक्की काय करायला पाहिजे.
ईडन पार्कच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने भरवले जायला पाहिजेत का नाही याची चर्चा रंगू लागली आहे. ईडन पार्कची विकेट किपर मागची सीमारेषा खूपच छोटी असल्याने फलंदाजाचा संपूर्णपणे चुकलेला फटकाही षटकार होतो आहे ही गोष्ट खेळाडूंना खटकू लागली आहे. ‘‘ईडन पार्कच्या विचित्र आकाराचा अंदाज आम्ही थोडा जास्त आला म्हणून काही चुका आम्ही टाळू शकलो’’, विराट कोहली सामन्यानंतर बोलताना म्हणाला. आयसीसीने नव्याने बांधल्या जाणार्या मैदानांच्या सीमारेषांची लांबी नियमात मांडली असली तरी पूर्वी पासून ज्या मैदानांवर सामने भरवले जात आहे त्याच्या सीमारेषांना नवे नियम लागू नाहीत हे खटकणारे आहे. ईडन पार्कचे मैदान गोलंदाजांवर अन्याय करते ही भावना खेळाडूंना बोचायला लागली आहे हे नक्की.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाची भारतीय क्रिकेट रसिकांना विजयाची भेट दिल्यानंतर श्रेयस अय्यर भेटला असता त्याने भारतीय संघाच्या पहिल्या दोन सामन्यातील कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. ‘‘न्युझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली ही गोष्ट आमच्या पथ्यावर पडली. भारतीय संघाला धावांचा पाठलाग करणे पसंत आहे. कप्तान विराट कोहली आणि रोहित शर्मा ज्या पद्धतीने डावाची आखणी करतात त्यातून आम्हांला बरेच काही शिकायला मिळते. त्यातून दुसर्या टी20 सामन्यात आम्हांला फक्त 133 धावांचा पाठलाग करायचा होता. त्यामुळे फलंदाजांना घाईगडबड करायची काहीच गरज नव्हती. के एल राहुल सोबत फलंदाजी करताना आम्ही इतकाच विचार केला की कोणीतरी एकाने शेवटपर्यंत विकेटवर थांबणे गरजेचे आहे. मला फिरकीला खेळताना आणि मोठे फटके मारताना अडचण येत नाही’’, श्रेयस अय्यर म्हणाला.
ईडन पार्कच्या मैदानावरच्या काही बाजू खूप जवळ तर काही बाजू खूप लांब आहेत त्यामुळे मोठे फटके हवेतून मारताना काय विचार तू करतोस असे विचारले असता श्रेयस अय्यर म्हणाला, ‘‘थोडा विचार येतो मनात पण हवेतून फटका मारताना आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. द्विधा मन:स्थितीत फटका मारून चालत नाही. त्यातून मी फिरकी गोलंदाजांवर हल्ला करायला टपून बसलेला असतो. गोलंदाजही दडपणाखाली असतो त्याचा अंदाज घेऊन मोठे फटके मारतो. खरं सांगू मला अजून 10 वर्ष भारतीय संघातून खेळायचे आहे. त्याकरता मिळालेल्या संधीचे सोने करायचा माझा प्रयत्न असेल’’, श्रेयस अय्यरने ‘सकाळ’ला सांगितले.
सोमवारी भारतीय संघ बसने ऑकलंडहून हॅमिल्टनला येऊन पोहोचला. संपूर्ण संघाने सोमवारी विश्रांती घेतली. संध्याकाळी खेळाडू मस्त तयार होऊन व्हीक्टोरीया स्ट्रीटवर चालत फिरताना दिसले. मंगळवारी थोडा सराव करून तिसर्या टी20 सामन्याकरता भारतीय संघ सज्ज होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.