esakal | मेस्सीचे 700 सामन्यात 613 गोल 

बोलून बातमी शोधा

लिओनेल मेस्सी गोलचा आनंद सुआरेजसह साजरा करताना

लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाकडून 700 वी लढत खेळताना त्यातील 613 वा गोल करण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर त्याने दोन गोलांना साथ दिली. त्यामुळे बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीगच्या प्राथमिक साखळीच्या गटात विजेतेपद निश्‍चित करताना बोरुसिया डॉर्टमंडला 3-1 असे हरवले. 

मेस्सीचे 700 सामन्यात 613 गोल 
sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाकडून 700 वी लढत खेळताना त्यातील 613 वा गोल करण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर त्याने दोन गोलांना साथ दिली. त्यामुळे बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीगच्या प्राथमिक साखळीच्या गटात विजेतेपद निश्‍चित करताना बोरुसिया डॉर्टमंडला 3-1 असे हरवले. 

कॅम्प नोऊवरील लढतीत मेस्सीने गोल करतानाच लुईस सुआरेझ तसेच अँतॉईन ग्रिएझमन यांनी केलेल्या गोलात निर्णायक पासही दिला होता. मेस्सी जबरदस्तच आहे. तो कधी काय करणार हाच प्रश्‍न असतो. त्याच्या प्रभावी कामगिरीमुळेच आम्ही आगेकूच केली आहे, असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक एर्नेस्टो वॅलवेर्दे यांनी सांगितले. दरम्यान, डॉर्टमंडला आता बाद फेरीसाठी स्लाविया प्रागविरुद्ध विजय आवश्‍यक आहे. त्याचबरोबर बार्सिलोनाचा साखळीतील अखेरचा विजयही हवा आहे. 

मेस्सी चेंडूचा ताबा नसतानाही वेगवान असतो. चेंडूचा ताबा घेतल्यावर तर त्याला रोखणे जास्तच अवघड असते. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी प्रसंगी फाऊल करणे हाच पर्याय असतो, पण त्या वेळी चेंडूचा ताबा मिळाल्यावर जास्त धोकादायक होतो, असे डॉर्टमंडचे मार्गदर्शक ल्युसिएन फॅवेरे यांनी सांगितले. मेस्सीने बार्सिलोनाच्या एकंदर 850 गोलांत वाटा उचलला आहे. त्याने 613 गोलना 231 असिस्टची जोड दिली आहे. 

चेल्सीची वाटचाल लांबली 
डॅनिएल वॅस याने अखेरच्या मिनिटात गोल केल्यामुळे व्हॅलेन्सियाने चेल्सीला 2-2 रोखले. त्यामुळे चेल्सीचा बाद फेरीतील प्रवेश लांबला आहे. दोघांतील घरच्या मैदानावरील लढतीत चेल्सी पराजित झाले होते, त्याचा वचपा काढण्याची त्यांची संधी हुकली. खरे तर व्हॅलेन्सियाला सदोष नेमबाजीचा फटका बसला. त्यांनी गोलच्या किमान पाच संधी दवडल्या. त्यातही मॅक्‍सी गोमेझने दोन सुवर्णसंधी दवडल्या, पण चेल्सी पाठीराख्यांच्या मते त्यांनीही अनेक गोल दवडले. या ह गटात ऍजॅक्‍स अव्वल आहेत. आता लीलीला पराजित केल्यास चेल्सी वाटचाल करू शकेल. ऍजॅक्‍सने त्यापूर्वी लीलीला 2-0 असे हरवले. 

लिपझिगची आगेकूच 
एमिल फॉर्सबर्गच्या दोन गोलमुळे लिपझिगने पिछाडीनंतर बेनफिकाला 2-2 रोखले. जर्मनीतील लिपझिगला वाटचाल करण्यासाठी बरोबरी पुरेशी होती, पण ते पराजित होणार असे वाटत होते, पण फॉर्सबर्गने 90 व्या मिनिटास पहिला आणि त्यानंतर सहा मिनिटांनी बरोबरीचा गोल केला. लिपझिगच्या बरोबरीमुळे लिऑनला दिलासा मिळाला. ते झेनित सेंट पीटर्सबर्गविरुद्ध 0-2 पराजित झाले, पण लिपझिगने आगेकूच केली आणि दुसऱ्या क्रमांकाची चुरस कायम राहिली. 

लिव्हरपूल आणि नापोली यांच्यातील लढत 1-1 बरोबरीत सुटली. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाची बाद फेरीची प्रतीक्षा कायम राहिली. आता दोघांनाही अखेरच्या साखळीतील बरोबरी बाद फेरीसाठी पुरेशी आहे.