FIFA World Cup 2022 : अर्जेंटिना थाटात उपउपांत्यपूर्व फेरीत

लिओनेल मेस्सीने पेनल्टी गमावली; पोलंडची पराभूत होऊनही आगेकूच
messi penalty miss poland vs argentina fifa world cup qatar 2022 press conference football
messi penalty miss poland vs argentina fifa world cup qatar 2022 press conference football sakal

दोहा : सुपरस्टार लिओनेल मेस्सीने पूर्वार्धात पेनल्टी किकवर गोल करण्याची संधी गमावली असली, तरी अर्जेंटिनाने पोलंडवर वर्चस्व राखत त्यांचा २-० असा पराभव केला. अर्जेंटिनासह या पराभवानंतरही पोलंड बाद फेरीसाठी पात्र ठरले. मेस्सी म्हणजे अर्जेंटिना असे समीकरण असले, तरी पोलंडविरुद्धच्या सामन्यात प्रभावहीन मेस्सीसह अर्जेंटिना संघाने आपला दरारा राखला. स्पर्धेत सलामीला सौदी अरेबियाकडून हार झाल्यानंतर सलग दोन सामन्यांत विजय मिळवणाऱ्या अर्जेंटिनाने गटात अव्वल स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट गाठले.

उपउपांत्यपूर्व सामन्यात त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल; तर पोलंडसाठी गतविजेते फ्रान्स प्रतिस्पर्धी असतील. मेस्सीने पेनल्टी गमावल्यामुळे पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत असलेल्या या सामन्यात मध्यांतरानंतर अर्जेंटिनाच्या खात्यात गोल जमा झाला. नाहुली मोलिनाच्या पासवर मॅक अलिस्टरने गोल केला. आम्ही सामन्याचे चांगले आकलन केले. त्यानुसार खेळ करताना आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्याचे समाधान मला अधिक आहे, असे स्कोलोनी यांनी सांगितले.

वादग्रस्त पेनल्टी

अर्जेंटिनाला पूर्वार्धात देण्यात आलेली पेनल्टी किक वादग्रस्त ठरली. रेफ्रींनी व्हिडीओ रिप्ले पाहून पेनल्टीचा हा निर्णय दिला. मेस्सी हेडर मारण्यासाठी पुढे आला त्या वेळी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात पोलंडचा गोलरक्षक स्झेस्नीचा ग्लोव्हज मेस्सीच्या चेहऱ्याला लागला, त्यामुळे अर्जेंटिनाला पेनल्टी दिली. ही पेनल्टी मेस्सीच घेणार होता, एक मिनिटापूर्वी आपल्याकडून फाऊल झालेला असला, तरी स्झेस्नीने संयम ढळू दिला नाही. मेस्सी हमखास गोल करणार अशी सर्वांची अपेक्षा होती, परंतु स्झेस्नीने चेंडू अडवला आणि सनसनाटी निर्माण झाली.

चेंडू पोलंडच्याच अर्धातच

हा पहिला गोल अर्जेंटिनाच्या चेंडूवरील नियंत्रणाचे फलित होता. त्यांनी सातत्याने पोलंडवर आक्रमण केले. सर्वधिक वेळ चेंडू पोलंडच्या अर्धातच राहत होता. त्यामुळे अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलिनो मार्टिनेझ हा जणू काही प्रेक्षक म्हणूनच मैदानात होता.

अर्जेंटिनाचा दुसरा गोल हा त्यांच्या नियोजनबद्ध आक्रमणामुळे झाला. एक चांगली चाल त्यांनी केली. एन्झो फर्नांडेसने पोलंडचा बचाव भेदला आणि मोक्याच्या क्षणी चेंडू अल्वारेझकडे दिला. त्याने कोणताही विलंब न करता चेंडू थेट गोलजाळ्यात धाडला.

लेवांडोवस्की निष्प्रभ

1 पोलंडची प्रमुख मदार अनुभव रॉब्रेट लेवांडोवस्कीवर होती. तोही बार्सिलोनाचा माजी खेळाडू आहे. या मोसमात त्याने बार्सिलोनाकडून १९ सामन्यांत १८ गोल केले आहेत, पण आज अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात त्याला गोल करण्यासाठी एकही संधी मिळाली नाही.

2 लेवांडोवस्की प्रभाव पाडू शकला नसला, तरी त्याचा खेळ संघाला पूरक होता. मी कोणावर टीका करणार नाही, परंतु संघातील इतर खेळाडूंनी त्याला गोल करण्यासाठी संधी निर्माण करून दिली नाही, अशी निराशा पोलंडचे प्रशिक्षक झेस्लॉ मिक्निविच यांनी व्यक्त केली.

पोलंड प्रशिक्षकांची मेस्सीवर अप्रत्यक्ष टीका

आमच्याकडे चेंडूवरचे नियंत्रण अधिक मिळाले असते आणि लिओनेल मेस्सी आमच्याकडून आणि लेवांडोवस्की अर्जेंटिनाकडून खेळला असता, तर त्याने किमान पाच गोल केले असते. या सामन्यात संधी असूनही मेस्सीने गोल केला नाही हे विसरू नका, असे सांगताना मिक्निविच यांनी अप्रत्यक्षपणे लेवांडोवस्कीला मेस्सीपेक्षा मोलाचा खेळाडू म्हणून संबोधले.

पोलंड १९८६ नंतर प्रथमच बाद फेरीत

पोलंडचा संघ या महत्त्वाच्या सामन्यात निष्प्रभ ठरूनही आणि पराभव स्वीकारूनही त्यांना बाद फेरीची लॉटरी लागली. पोलंडला साखळी सामन्यातील ३ लढतीत एकच विजय मिळवला आला. त्यांचा एक सामना बरोबरी सुटला तर एका सामन्यात पराभव झाला.१९८६ नंतर प्रथमच त्यांचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com