Milind Narvekar : क्रिकेटकारणातही मिलिंद नार्वेकरांचा बोलबाला…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानंतर क्रिकेटच्या संघटनात्मक पातळीवर जर कुणाचे नाव येत असेल तर ते मुंबई क्रिकेट संघटनेचे
Milind Narvekar
Milind Narvekarsakal

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानंतर क्रिकेटच्या संघटनात्मक पातळीवर जर कुणाचे नाव येत असेल, तर ते मुंबई क्रिकेट संघटनेचे. सहाजिकच या क्रिकेट विश्वाची आणि वलयाची भुरळ राजकीय व्यक्तींना पडली नसती, तर नवल होते.शिवसेनेने याची सुरुवात केली.

मनोहर जोशी यांनी सर्वात प्रथम माधव मंत्री यांचा पराभव करून मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर आले विलासराव देशमुख. त्यांनी अजित वाडेकरांना माघारी धाडले. महाराष्ट्राच्या रांगड्या कबड्डी, कुस्ती, खो-खो खेळाचा प्रसार करून शरद पवारही येथे स्थिरावले. मुंबई क्रिकेट संघटनेच्या नव्या कार्यकारिणीकडे असे कुठले नेतृत्व नाही. अमोल काळे हे अध्यक्ष झाले असले, तरी ते राजकीय वर्तुळात फारसे परिचीत नाहीत. यानंतरही या कार्यकारिणीत एक असा चेहरा आहे की जो पडद्यामागे राहिला. पण, मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीचे जे काही नाट्य रंगले, त्याचा निर्माता, लेखक, दिग्दर्शक वेगळाच होता. तो म्हणजे मिलिंद नार्वेकर.

शिवसेना आणि त्यातही ठाकरे कुटुंबियांच्या अगदी जवळील नाही. ठाकरे घराण्याची विश्वासर्हता म्हणजे नार्वेकर अशी प्रतिमा निर्माण झाली होती. मंध्यतरीच्या काळात शिवसेनेत आलेल्या वादळानंतरही ते ठाकरे कुटुंबियांशी एकनिष्ठ आले यातच सगळे आले. कार्यतत्परता आणि संभाषण कौशल्य यामुळे नार्वेकर यांनी कायमच समोरच्याला जिंकून घेतले. राजकारणाच्या बाहेर त्यांचा क्रिकेटशी संबंध म्हणजे मालाडमध्ये त्यांनी हिंदु क्रिकेट क्लबची सुरुवात केली. मुंबई क्रिकेटमध्ये आणि पर्यायाने संघटनेत शिरकाव करण्याची त्यांची ही पहिली पायरी होती. पुढे जाऊन मुंबई क्रिकेट लीगचे कार्याध्यक्षपद नार्वेकरांनी भूषविले. तेव्हा मुंबई क्रिकेट वर्तुळात ते मोठ्या तेजाने चमकू लागले. मुंबई लीगचा प्रसार वाढवून त्यांनी मुंबई क्रिकेटमध्ये आपली ताकद वाढवायला सुरुवात केली. ही ताकद इतकी भक्कम झाली, की मुंबई क्रिकेट संघटना त्यांना खुणावू लागली.

यंदाची मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक ही त्याची नांदी ठरली यात शंका नाही. मिलिंद नार्वेकर या निवडणूकीत अॅपेक्स कौन्सिल सदस्यपदी पहिल्या क्रमांकाची मते मिळवून निवडून आले. नार्वेकर यंचा हा मुंबई क्रिकेटमधील शिरकाव आहे. भविष्यात मुंबई क्रिकेट संघटनेवरील ते आपली पकड घट्ट करणार यात शंका नाही हे यंदाच्या निवडणूकीवरून दिसून आले. यंदाची निवडणूक इतकी चर्चेत राहिल असे कधीच वाटले नव्हते. आशिष शेलार अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले. शरद पवार गटाकडून माजी कसोटीपटू संदीप पाटिल रिंगणात होते. त्यामुळे आव्हान तगडे होते. दुसरीकडे बीसीसीआयची निवडणूक देखिल तोंडावर होती. अशा वेळी अचानक चक्रे फिरकी आणि शरद पवार, भाजपा एकत्र आले.

संदिप पाटिल यांचा पत्ता अलगद कट झाला. आशीष शेलार यांची निवड पक्की झाली. दुसरे दिवशी आशीष शेलार बीसीसीआयचे अध्यक्ष झाले आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अमोल काळे यांचे नाव पुढे आले. अर्थात, ते निश्चित होते. यथावकाश मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक पार पाडली आणि काळे अध्यक्षपदी विराजमान झाले. हे सगळे नाट्य घडण्यामागे नार्वेकर आघाडीवर होते.

राजकारणात असलेला वावर, संभाषण आणि संघटन कौशल्य या जोरावर नार्वेकरांनी भाजपा आणि शरद पवार यांची मोट बांधली. राजकीय पटलावर एकमेकांचे विरोधक असलेले हे दोन्ही गट एकत्र आणण्यात नार्वेकरांचा वाटा मोठा होता. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसशी झालेल्या मैत्रीचा त्यांनी बरोबर फायदा घेतला आणि क्रिकेट मुत्सदेगिरी दाखवून त्यांनी एका रात्रित मुंबई क्रिकेट संघटनेची गणिते बदलून टाकली. निवडणूक अमोल काळे यांनी जिंकली असली, तरी या निवडणूकीत नार्वेकर खऱ्या अर्थाने क्रिकेटकारणात अष्टपैलू म्हणून समोर आले यात शंकाच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com