धोनी निवृत्त होतोय.. विंडीज दौऱ्यावर न जाण्याचे संकेत!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर माजी कर्णधार आणि भरवशाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघामध्ये धोनी असणार का, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. इंग्लंडमधून परतल्यानंतर धोनी त्याच्या भवितव्याविषयी काही घोषणा करण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर माजी कर्णधार आणि भरवशाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघामध्ये धोनी असणार का, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. भारतीय संघ अद्याप इंग्लंडमध्येच आहे. इंग्लंडमधून परतल्यानंतर धोनी त्याच्या भवितव्याविषयी काही घोषणा करण्याची शक्‍यता आहे. 

धोनीने कसोटीमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. वेस्ट इंडिजच्या तीन ट्‌वेंटी-20, तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्यावर जाणारा संघ निवडीसाठी 17 किंवा 18 जुलै रोजी मुंबईमध्ये बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनी या दौऱ्यावर जाणार नाही. 

यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नसली, तरीही यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या संघात समावेश असलेल्या दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत या दोघांनाही विंडीज दौऱ्यावर जाण्याची संधी मिळू शकते. संघात दोन यष्टिरक्षक असल्याने धोनी विंडीजच्या दौऱ्यामध्ये नसण्याचीच दाट शक्‍यता आहे. तसेच, सततच्या क्रिकेटमुळे काही प्रमुख खेळाडूंना विश्रांतीही दिली जाऊ शकते. यामध्ये कर्णधार विराट कोहलीसह रोहित शर्मा, जसप्रित बुमरा, हार्दिक पंड्या, भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी यांचा समावेश असू शकतो. हे खेळाडू ट्‌वेंटी-20 आणि एकदिवसीय मालिकेत न खेळता थेट कसोटी मालिकेसाठी संघात दाखल होतील. 

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा आहे. त्या स्पर्धेपर्यंत धोनी वाट पाहणार की लगेच निवृत्ती जाहीर करणार, याबाबत चर्चा सुरू आहे. धोनी यासंदर्भात स्वत:च माहिती देण्याची 'बीसीसीआय' वाट पाहत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni Likely to retire as he will not be going to West Indies tour