विराट एनकाऊंटर स्पेशालीस्ट

Virat Kohli
Virat Kohli

शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी हैदराबाद शहरात दोन एनकाऊंटर झाल्या असे सांगितले तर कुणीही चकित होईल. एक एनकाऊंटर पोलिसांनी केली. त्यासाठी बंदूकीचा वापर करण्यात आला. प्रियंका रेड्डीवर बलात्कार केलेले नराधम पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना यमसदनास धाडले आणि त्यांचा खेळ खल्लास केला.

...ही आहे दुसरी एनकाऊंटर
आता दुसरी एनकाऊंटर कुठली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ही एनकाऊंटर बंदूकीने नव्हे तर बॅटने झाली. टीम इंडियाचा कमांडो विराट कोहली हा हैदराबादमध्ये एनकाऊंटर स्पेशालिस्ट म्हणून पुन्हा एकदा धडाडला. केसरीक विल्यम्सचा त्याने खात्मा केलाच, पण याद्वारे त्याने तमाम प्रतिस्पर्ध्यांना सावधानतेचा इशारा पुन्हा एकदा दिला.

टी20 वर्ल्ड कपचे रणशिंगही फुंकले 
त्याचवेळी विराटने पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपचे रणशिंग फुंकले असा निष्कर्ष काढणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. यंदा वन-डे वर्ल्ड कपचे जेतेपद हुकल्यामुळे विराट दुखावला गेला आहे. तसे तो 2011चा जगज्जेता आहे, पण त्याला कॅप्टन म्हणूनही वर्ल्ड कप जिंकायचा आहे. आयसीसी जागतिक कसोटी स्पर्धेकडे पाहण्याचा विराटचा दृष्टिकोन हेच सांगतो. त्याला फक्त एक नंबर ठाऊक आहे आणि तो म्हणजे नंबर वन.

उक्तीला अपवाद
मौनम सर्वार्थ साधनम ही उक्ती क्रिकेटच्या संदर्भात लागू करता येईल. टीकाकारांना उत्तर देण्यासाठी क्रिकेटपटू बोलतात ते बॅटनेच. चेंडू-फळीच्या या खेळात कामगिरी हेच उत्तर असते. मैदानावर ती करून दाखवायची असते. मग वेगळे काही बोलण्याची गरज उरत नाही.

बॅट बोलतेच आणि देलबोली तर जास्तच बोलकी
प्रत्येक म्हणीला अपवाद हे असतातच. त्यास ही म्हण तरी कशी अपवाद ठरणार. विराट हा असाच एक अपवादात्मक क्रिकेटपटू. मैदानावर एकाग्रता ढळून पराभूत झाल्याची असंख्य उदाहरणे वैयक्तिक-सांघिक खेळांमध्ये असंख्य आहेत. विराटला क्रोध प्रेरीतच करतो. त्याला डिवचले तर तो खचत नाही तर उसळी घेतो. तो बॅटने प्रत्यूत्तर देतोच, पण मग शांत न बसता मुठी आवळून अशी देहबोली प्रदर्शित करतो की प्रतिस्पर्ध्याला पश्चात्ताप झाल्याशिवाय राहात नाही. 

करतो बिचारा प्रयत्न
खरे तर अलिकडे विराटने स्वतःमधील आक्रमकतेला मुरड घालण्याचे प्रयत्न केल्याचे जाणवत होते, पण विल्यम्ससारखे वीर असे काही करतात तेव्हा विराटमधील महावीर जागा होऊन पेटल्याशिवाय राहणे अशक्य असते.

विंडीजसाठी जोश हे अस्त्रच
विंडीजचे क्रिकेटपटू जोशात खेळतात. त्यांना मुळात डिवचलेले चालत नाही. याआधीचा टी20 वर्ल्ड कप भारतात झाला होता. त्याआधी इंग्लंडचे समालोचक मार्क निकोलस यांनी विंडीजचे क्रिकेटपटू बिनडोक असल्याची टिप्पणी केली होती. विंडीजने इंग्लंडलाच धुळ चारून वर्ल्ड कप खिशात टाकला.

नवा कर्णधार-नवा राज
विल्यम्सची कृती वैयक्तिक नव्हे तर प्रातिनिधीक मानली पाहिजे. याचे कारण भक्कम आव्हान उभारल्यानंतरही विंडीजने जिगर प्रदर्शित केली होती. विंडीजच्या नेतृत्वाची धुरा आता कायरन पोलार्डकडे आली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना पोलार्डने वेळोवेळी खुन्नसयुक्त खेळाचे प्रदर्शन केले आहे. देशबांधव ड्वेन ब्राव्हो विरुद्ध पोलार्ड ही चकमक 2016च्या मोसमात झडली होती. पोलार्डच्या दृष्टिकोनाचे, स्वभावाचे अन्् एकूण व्यक्तीमत्त्वाचे पडसाद विंडीज संघाच्या कामगिरीवर उमटणे अपरिहार्य आहे.

...पण समोर विराट आहे बाबांनो
विंडीजचा संघ एक गोष्ट मात्र विसरला किंवा त्यांना त्याची तीव्रता तेवढी जाणवली नसावी. विराट हा सुद्धा अव्वल आव्हानवीर आहे. आव्हानाला सामोरे जाताना त्याची कामगिरी बहरते. त्याचा खेळ उंचावतो. त्याचे मनोधैर्य दुप्पट होते. हैदराबादमधील एनकाऊंटरद्वारे विराटने हाच इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com