इंग्लंड रिचार्ज, कांगारू रिस्टार्ट, कुणाची बॅटरी जास्त चालणार?

Ashes Series
Ashes Series

क्रिकेटमध्ये सर्वांत प्रदिर्घ इतिहास असलेल्या अॅशेस मालिकेला लवकरच एजबस्टन मैदानावर प्रारंभ होत आहे. वर्ल्ड कपचे गतविजेते आणि अॅशेस विजेते म्हणून कांगारू इंग्लंडमध्ये दाखल झाले. इंग्लंडला मायदेशात त्यांच्याविरुद्ध दुहेरी मोहीमेला सामोरे जायचे होते. यात उपांत्य फेरीत कांगरूंना हरवून आणि मग पुढे जाऊन इंग्लंडने वर्ल्ड कप जिंकला. म्हणून अॅशेसमध्ये त्यांचे पारडे जड असेल असे नक्कीच नाही. याचे कारण कसोटी क्रिकेट आणि त्यातही अॅशेसची गोष्टच वेगळी असते.

इंग्लंड मायदेशात 2001 पासून अॅशेस मालिकेत हरलेले नाहीत. एजबस्टन मैदानावर गेल्या 11 वर्षांत त्यांनी ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले आहे. मागील मालिकेत मात्र कांगारूंची मायदेशात 4-0 अशी सरशी झाली आहे. कांगारूंसाठी वर्ल्ड कप गमावल्यामुळे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे एकूणच क्रिकेट रिस्टार्ट मोडमध्ये नेल्यामुळे ही मालिका महत्त्वाची आहे.

कांगारूंनी संभाव्य संघात निवड चाचणी सामना घेऊन आगळा प्रयोग केला. त्यांनी त्यांच्या पातळीवर व त्यांच्या पद्धतीने सर्वोत्तम संघ निवडला आहे. या संघाचे नेतृत्व टीम पेन याच्याकडे आहे. त्याच्यासमोर यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून मॅथ्यू वेड याचे आव्हान आहे. दुसरीकडे फलंदाजीत लौकीक आणि कामगिरीत सरस असलेला ज्यो रुट प्रतिस्पर्धी कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सँडपेपर गेटमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची नाचक्की झाली. मग मायदेशात त्यांना भारताविरुद्ध पराभूत व्हावे लागले. आखातात पाकिस्तान व भारताविरुद्ध भारतात वन-डे मालिका असे दोन विजय सोडले तर कांगारूंना बरेच काही सिद्ध करून दाखवायचे आहे आणि त्यासाठी अॅशेसहून जास्त मोठे व्यासपीठ आणि चांगली संधी त्यांना मिळणार नाही.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींनी डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ आणि कॅमेरॉन बँक्रॉफ्ट यांना माफ करून त्यांचे खुल्या दिलाने स्वागत केले आहे. मुख्य म्हणजे नवे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी त्यांचे पुनरागमनाची प्रक्रिया अधिकाधिक सुरळीत व सुकर कशी होईल यासाठी योजनाबद्ध प्रयत्न केले आहेत. कांगारू संघनिवडीत कधीही भावनांचा विचार करीत नाहीत. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये विक्रमी कामगिरी करूनही मिचेल स्टार्क पहिल्या कसोटीसाठी अंतिम संघात स्थान मिळवू शकला नाही तर नवल वाटायला नको.

इंग्लंडच्या संघानेही असेच धोरण ठेवले आहे. जोफ्रा आर्चर पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला घेण्यात आले नाही. जेसन रॉय याला सलामीवीर म्हणून निवडत इंग्लंडने सर्वोत्तम पर्याय मिळविला आहे. ज्यो रूट महत्त्वाच्या तिसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी पुढाकार घेऊन लढणार आहे. मागील मालिकेत इंग्लंडला अष्टपैलू बेन स्टोक्स याची उणीव जाणवली. त्याने वर्ल्ड कप गाजवून अॅशेससाठी रणशिंग फुंकले आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचे चित्र हे रिचार्ड मोड दाखविणारे आहे.

पाच कसोटींची मालिका प्रदिर्घ असते. त्यात काही सत्रांमधील खेळ पारडे फिरवितो. पावसाचा व्यत्यय आला नाही तर पाचही कसोटी निकाली ठरतील याची तज्ञांना खात्री आहे. निकालाचा फरक 3-2 असा किमान असेल असेही अनेकांना वाटते. जागतिक कसोटी मालिकेला प्रारंभ करणारी ही मालिका आहे. त्यामुळे चुरशीची तीव्रता वाढणार आहे. अशावेळी कोणत्या संघाची बॅटरी जास्त चालणार याला महत्त्व आहे. याचे कारण अंतिम निकाल एका काडीवर, एका सत्रावर ठरणार आहे.

दोन्ही संघांमधील स्टार-सुपरस्टार बघता अॅशेसचा थरार लुटण्यासाठी सज्ज होऊयात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com