मुंबईतील एनबीए लढतीसाठी राजेशाही प्रवास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

मुंबईतच नव्हे तर भारतात होणाऱ्या पहिल्यावहिल्या एनबीए संघातील लढतीसाठी सॅक्रामेंटो किंग्ज संघ राजेशाही प्रवास करणार आहे. आपल्या खेळाडू आणि मार्गदर्शकांसाठी संघमालक विवेक रणदिवे यांनी बोईंगच तैनात केले आहे.

मुंबई : मुंबईतच नव्हे तर भारतात होणाऱ्या पहिल्यावहिल्या एनबीए संघातील लढतीसाठी सॅक्रामेंटो किंग्ज संघ राजेशाही प्रवास करणार आहे. आपल्या खेळाडू आणि मार्गदर्शकांसाठी संघमालक विवेक रणदिवे यांनी बोईंगच तैनात केले आहे.

मुंबईत जन्मलेल्या रणदिवे यांचे एनबीए संघांची लढत मुंबईत आयोजित करणे, हे स्वप्न आहे. आपल्या स्वप्नपूर्तीचा संघास त्रास होऊ नये यासाठी त्यांनी 18 कोटी 50 लाख डॉलरचे विमान भाड्याने घेतले आहे. ड्रेक या ग्रॅमी पुरस्कार विजेत्या कॅनडातील रॅप आर्टिस्टचे हे विमान आहे. मूळचे कार्गो असलेल्या विमानात अत्याधुनिक सुविधा आहेत. हे विमान नव्हे तर आलिशान घरच असल्याचे सांगितले जाते.

अमेरिका आणि भारताच्या प्रमाणवेळेत जवळपास बारा तासांचा फरक आहे. याच्याशी जुळवून घेणे आपल्या संघाला शक्‍य व्हावे यासाठीच हा निर्णय झाला आहे. या सुविधेवर खेळाडू तसेच मार्गदर्शक खूष आहेत. आता हा अठरा तासांचा प्रवास खूपच सुखकर असेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत येण्यापूर्वी हा संघ आग्र्याला भेट देणार आहे.

भारतातील बास्केटबॉल प्रसाराचा कार्यक्रमही
मुंबईतील दोन लढतींच्या निमित्ताने बास्केटबॉलचा प्रसार करण्यासाठी एनबीए विविध कार्यक्रम करणार आहे. त्यात खेळाडू, मार्गदर्शकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचाही अंतर्भाव आहे. खेळातील प्रगतीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने मुलींचा सहभाग वाढवण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात येईल. त्यात मुंबई महापालिका शाळांचीही खेळाच्या प्रसारासाठी निवड झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for mumbai match NBA team will travel like a KING