प्रत्येक स्वप्न आणि पदक हे "गुरूं'साठीच - राहुल आवारे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

-कारकिर्दीत पाहिलेले प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक पदक हे आपले गुरू स्व. हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्यासाठीच असेल

-जागतिक स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर राहुल मंगळवारी पुण्यात दाखल झाला, त्या वेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचे वाजतगाजत जंगी स्वागत केले.

-ऑलिंपिक माझे ध्येय निश्‍चित आहे. पण त्यासाठी घाई करणार नाही. टप्प्याटप्प्याने मार्गदर्शकांचा सल्ला घेऊनच मी पाऊल उचलणार आहे

पुणे - जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत 61 किलो वजन गटात ब्रॉंझपदक मिळविणाऱ्या राहुल आवारे याने "कारकिर्दीत पाहिलेले प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक पदक हे आपले गुरू स्व. हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्यासाठीच असेल,' अशी भावना व्यक्त केली. जागतिक स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर राहुल मंगळवारी पुण्यात दाखल झाला, त्या वेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचे वाजतगाजत जंगी स्वागत केले. 

भारतीय कुस्ती संघातील विजयी मल्लांचे आज सकाळी नवी दिल्लीत क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी कौतुक केले. त्यानंतर राहुल संध्याकाळी पुण्यात परतला. त्या वेळी विमानतळावर त्याची आई शारदा आणि वडील बाळासाहेब यांनी त्याचे स्वागत केले. राहुलचे सध्याचे गुरू अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे या वेळी उपस्थित होते. 

विमानतळावरील चाहत्यांच्या गर्दीतच राहुलशी संवाद साधला तेव्हा त्याने आपल्याला घडविणाऱ्या सर्व गुरूंचे आभार मानले. तो म्हणाला, ""मला जन्म देणारे आई-वडील यांनी मला आयुष्यात उभे राहायला शिकवले, त्यानंतर कोल्हापूर, पुणे असा प्रवास करत गोकूळ वस्ताद तालमीत गुरू हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्याकडे आलो आणि माझ्या कारकिर्दीला पैलू पडले. माझे आजपर्यंतचे सर्व यश हे त्यांचेच आणि त्यांच्यानंतर माझा सांभाळ करणाऱ्या काका पवार यांचे आहे. त्यामुळे माझे प्रत्येक स्वप्न आणि पदक हे मला घडविणाऱ्या गुरूंचेच असेल. मी फक्त त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून चालत आहे.'' 

जागतिक कुस्ती स्पर्धेतील यशाविषयी बोलताना राहुल म्हणाला, ""स्पर्धेत माझ्यासाठी "ड्रॉ' अनुकूल होता. उपांत्य फेरीत माझे नियोजन चुकले. पण ब्रॉंझपदकाच्या लढतीत चुका सुधारल्या आणि देशासाठी पदक मिळविले. महाराष्ट्राला जागतिक पदक देणारा मल्ल ठरलो याचा अधिक आनंद आहे. आता अधिक सराव करून यापुढील प्रत्येक स्पर्धेत सातत्य राखणे हेच माझ्यासमोरील आव्हान आणि उद्दिष्ट असेल.'' 

ऑलिंपिक स्वप्नाविषयी बोलताना राहुल म्हणाला, ""ऑलिंपिक माझे ध्येय निश्‍चित आहे. पण त्यासाठी घाई करणार नाही. टप्प्याटप्प्याने मार्गदर्शकांचा सल्ला घेऊनच मी पाऊल उचलणार आहे. या वेळी जागतिक पदक मिळवून मी एक पाऊल पुढे टाकले आहे. हे पाऊल आता पुढेच राहाणार आणि भविष्यात या ब्रॉंझपदकाचा रंग सोनेरी करणार यात शंका नाही.'' 

हरिश्‍चंद्रांच्या फॅक्‍टरीतच घडलो 
कुस्तीतच कारकीर्द घडविण्याचा निश्‍चय उराशी बाळगूनच पुण्यात आलो होतो. स्व. हरिश्‍चंद्र बिराजदार यांच्या गोकूळ वस्ताद तालमीत दाखल झालो. माझ्या कारकिर्दीला येथेच वळण मिळाले. गोकूळ वस्ताद तालीम हे फक्त नाव होते. ती खरे तर हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गुरू बिराजदार यांनी दिशा दिली आणि पुढे त्यांचाच पठ्ठा काका पवार यांनी सांभाळले. येथे आलो नसतो, तर ही मजल मारूच शकलो नसतो. एकूणच माझ्या कारकिर्दीत या "हरिश्‍चंद्रांच्या फॅक्‍टरी'ला महत्त्वाचे स्थान आहे, असे राहुलने आवर्जुन सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My every dream and medal for coach - rahul aware