पंतप्रधान मोदींचा करणार मोठी घोषणा; 'स्वच्छ भारत'नंतर आता 'तंदुरुस्त भारत'

वृत्तसंस्था
Thursday, 22 August 2019

संपूर्ण देश स्वच्छ ठेवण्यासाठी "स्वच्छ भारत' योजना सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता "तंदुरुस्त भारत' या नव्या योजनेला सुरवात करणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनी (29 ऑगस्ट) पंतप्रधान या नव्या योजनेची घोषणा करतील. 

नवी दिल्ली : संपूर्ण देश स्वच्छ ठेवण्यासाठी "स्वच्छ भारत' योजना सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता "तंदुरुस्त भारत' या नव्या योजनेला सुरवात करणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनी (29 ऑगस्ट) पंतप्रधान या नव्या योजनेची घोषणा करतील. 

देशातील जनतेला तंदुरुस्त राहण्याचा संदेश देण्यासाठी येथील इंदिरा गांधी मैदानावर या नव्या "तुंदुरुस्त भारत' योजनचा श्रीगणेशा होणार आहे. "खेलो इंडिया' अंतर्गत क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली विविथ टप्प्यात ही नवी योजना चार वर्षे म्हणजे 29 ऑगस्ट 2023 पर्यंत राबविली जाणार आहे. 
देशातील प्रत्येक जनतेसाठी 

ही योजना केवळ खेळाडूंसाठी नाही, तर देशातील आणि परदेशातील प्रत्येक भारतीयांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरक ठरणार आहे. क्रीडा मंत्रालय आणि खेलो इंडिया अंतर्गत तंदुरुस्तीबाबत जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी अव्वल खेळाडूंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करून घेतला जाणार आहे. विविध पातळींवर स्वयंसेवकांची फळी देखील तयार केली जाणार आहे. एका "क्‍लिक'वर योजना सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी मोबाईल ऍप, स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण केले जाणार असून, सोशल मिडीयाचाही उपयोग करून घेतला जाणार आहे. 

क्रीडा मंत्री साधणार संवाद 
केंद्र सरकारची ही योजना प्रत्येक राज्यात पोचविण्यासाठी केंद्रिय मंत्री किरेन रिजीजू स्वतः पुढाकार घेऊन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनी होणारा कार्यक्रम पाहून त्याप्रमाणे योजना आपल्या राज्यात राबविण्यास सुरवात करावी यासाठी रिजीजू आग्रही आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi to declare campaign for Fit India