लोवलिनाची निवड न्यायालयाच्या निकालावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोवलिनाची निवड न्यायालयाच्या निकालावर

लोवलिनाची निवड न्यायालयाच्या निकालावर

नवी दिल्ली : राष्ट्रीय बॉक्सिंग संघातील लोवलिनाच्या थेट समावेशावरून रणकंदन सुरू झाले आहे. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले असून न्यायालयाने निकाल लोवलिना बार्गोहेनच्या बाजूने दिला नाही, तर तिला चाचणी स्पर्धेद्वारे आपली निवड निश्‍चित करावी लागणार आहे. लोवलिना ऑलिंपिक पदकविजेती असल्यामुळे तिला जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात थेट प्रवेश देण्यात आला होता.

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनकडून डिसेंबर महिन्यात तुर्की येथे आयोजित करण्यात येणारी जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही मानाची स्पर्धा २०२२ सालामध्ये मार्च महिन्यात खेळविण्यात येण्याची दाट शक्यता आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघात राष्ट्रीय स्पर्धेतील विविध वयोगटात विजेत्या ठरलेल्या बॉक्सर्सना थेट प्रवेश देण्यात येणार आहे.

लोवलिनाच्या समावेशाबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असून २२ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच लोवलिना बार्गोहेनचा समावेश असलेल्या ७० किलो वजनी गटाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

लोवलिनाने टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला ब्राँझपदक जिंकून दिले. त्यामुळे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडून तिला जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर जागतिक युवा चॅम्पियन बॉक्सर अरुंधती चौधरी हिने ७० किलो वजनी गटात लोवलिनाविरुद्ध चाचणीची मागणी करीत हायकोर्टात धाव घेतली. यावर नवी दिल्ली उच्च न्यायालयाकडून खेळाडूंच्या निवडीत पारदर्शकता असायला हवी, असे आदेश युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाला दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

चाचणीबाबतही निर्णय घेण्यात येईल

जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे निवड झालेल्या खेळाडूंच्या फिटनेस व सरावाकडे लक्ष देण्यात येणार आहे का, असे विचारले असता हेमंता कलिता यांनी नमूद केले की, खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर सुरूच राहणार आहे. तसेच खेळाडूंच्या फिटनेसचीही चाचणी करण्यात येणार आहे. प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ यांचेही खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. जागतिक स्पर्धेपूवी महिला बॉक्सर्सची चाचणी घ्यायची की नाही, याबाबतही निर्णय घेण्यात येईल.

"जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी आम्ही राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंसोबत ऑलिंपिक विजेती लोवलिना हिला पाठविणार आहोत. उच्च न्यायालयाकडून जो निर्णय घेण्यात येईल, तो आम्हाला मान्य असेल. लोवलिना बार्गोहेनचा थेट प्रवेश नाकारल्यास तिला चाचणीला सामोरे जावे लागणार आहे."

- हेमंता कलिता, भारतीय बॉक्सिंग संघटनेचे सरचिटणीस

loading image
go to top