National Games 2022 : तलवारबाजीत महाराष्ट्राची पदकांची पंचमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Games 2022 historic performance by Maharashtra athletes sport fencing five medals in national sports competition

National Games 2022 : तलवारबाजीत महाराष्ट्राची पदकांची पंचमी

गांधीनगर : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी फेन्सिंग (तलवारबाजी) या खेळामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पाच पदकांची माळ आपल्या गळ्यात घालत ऐतिहासिक प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या खेळात एक रौप्यपदक आणि चार ब्राँझपदकांना गवसणी घातली. तलवारबाजीतील सेबर सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ब्राँझपदक जिंकले. सेबर सांघिक मुलांमध्ये महाराष्ट्राचा सामना उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य जम्मू काश्मीर संघासोबत झाला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्राने (४५- ४३) अवघ्या दोन गुणांनी मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची लढत पंजाब संघासोबत झाली. पंजाब संघााने ४५-३३ अशा मोठ्या फरकाने महाराष्ट्र संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील पराभवामुळे महाराष्ट्र संघास ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात अभय शिंदे, धनंजय जाधव, श्रीशैल शिंदे व ऋत्विक शिंदे यांचा समावेश होता.

समर्थ, रुचिताचा अचूक वेध युवा नेमबाज समर्थ मंडलिक आणि रुचिता विनेरकरने महाराष्ट्र संघाला नेमबाजीत तिसरे पदक मिळवून दिले. या दोघांनी एअर पिस्तूल मिश्र गटात ब्राँझपदक आपल्या नावे केले.

स्क्वॉशमध्ये महिलांना ब्राँझ

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष स्क्वॉश संघाने अंतिम फेरीत धडक मारून एक पदक निश्चित केले आहे. महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने बलाढ्य सेनादलाच्या संघास २-१ ने पराभूत करून अंतिम फेरी गाठली हे विशेष. महिला गटात महाराष्ट्राचा महिला संघ ब्राँझपदकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने अप्रतिम कामगिरी करीत उपांत्य फेरी गाठली होती. तमिळनाडूकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे महाराष्ट्र महिला स्क्वॉश संघास ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

जिम्नॅस्टिक्समध्ये आठ पदकांची कमाई

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राने निर्विवाद वर्चस्व गाजवत एक सुवर्ण व एक रौप्यपदक प्राप्त केले. खेलो इंडियामध्ये अव्वल ठरलेली संयुक्ता काळे (ठाणे) हिने उत्कृष्ट कामगिरी करून १०१.६५ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राने एकूण आठ पदकांवर नाव कोरले.

जलतरणात अवंतिकाला विक्रमासह सुवर्णपदक

महाराष्ट्राच्या अवंतिका चव्हाण हिने ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तिने हे अंतर २६.५४ सेकंदात पार केले. या शर्यतीमधील प्राथमिक फेरीत माना पटेल हिने हे अंतर २६.६० सेकंदात पार केले होते आणि विक्रम नोंदविला होता.

टॅग्स :sportsmedalsindian sport