ऑलिंपिक पात्रता लढतीपूर्वी भारतीय हॉकी संघांची चाचणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय हॉकी संघ अद्याप पात्र ठरले नसले, तरी ऑलिंपिक हॉकी चाचणी स्पर्धेत त्यांचा सहभाग असेल. या चाचणी स्पर्धेद्वारे ऑलिंपिक पात्रता लढतीसाठी तयार होण्याची संधी भारतीय संघांना मिळणार आहे. टोकियोतील चाचणी स्पर्धेसाठी भारतीय संघ आज रवाना झाले.

मुंबई : टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय हॉकी संघ अद्याप पात्र ठरले नसले, तरी ऑलिंपिक हॉकी चाचणी स्पर्धेत त्यांचा सहभाग असेल. या चाचणी स्पर्धेद्वारे ऑलिंपिक पात्रता लढतीसाठी तयार होण्याची संधी भारतीय संघांना मिळणार आहे. टोकियोतील चाचणी स्पर्धेसाठी भारतीय संघ आज रवाना झाले.

हॉकी इंडियाने पुरुष हॉकी संघातील नवोदित खेळाडूंची या स्पर्धेद्वारे चाचणी करण्याचे ठरवले आहे. या स्पर्धेतील भारताच्या प्रतिस्पर्धी संघांचे जागतिक मानांकन भारतापेक्षा कमी असल्याने हा निर्णय झाला आहे, मात्र त्याच वेळी महिला संघाच्या मानांकनापेक्षा सरस संघ असल्याने ताकदवान संघ पाठवण्यात आला आहे. महिला संघास या स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला कस आजमावता येणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत महत्त्वाची आहे. आम्ही या वर्षभरात जपान; तसेच चीनला हरवले; पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. ही लढत जिंकलो तर आमच्या ऑलिंपिक लढतीच्या पूर्वतयारीस चांगलीच बळकटी येईल, असे भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने सांगितले.

पुरुषांच्या स्पर्धेत भारतास जपान, न्यूझीलंड आणि मलेशियाचे आव्हान असेल. "जपानमधील स्पर्धात नवोदितांसाठी चांगली संधी आहे. ऑलिंपिक पात्रता लढतीसाठी संघ निवडताना ही कामगिरी नक्कीच लक्षात घेतली जाईल', असे भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सांगितले.

या स्पर्धेचा आम्हाला मुख्य ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळीही फायदा होईल. येथील वातावरण कसे असेल. मैदान कसे आहे, याचीही कल्पना येईल, असेही तो म्हणाला. ही चौरंगी स्पर्धा 17 ते 21 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: olympic test event will help india hockey team to preapare for olympic qualifier