सिंधू, श्रीकांत, प्रणय यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पी.व्ही. सिंधू, लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत

सिंधू, श्रीकांत, प्रणय यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

बाली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी २०२१ इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

गुरुवारी झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूने स्पेनच्या क्लारा अझुरमेंडीचा तीन सेटमध्ये १७-२१, २१-७, २१-१२ असा पराभव केला; तर श्रीकांतने पुरुष एकेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या सातव्या क्रमांकाच्या जोनाटन क्रिस्टला १३-२१,२१-१८,२१-१५ असे हरवले. भारताच्या एच. एस. प्रणॉयने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या व्हिक्टर एक्सेलसेनला २१-१४, २१-१९, २१-१६ असे नमवत आगेकूच केली. आता उपांत्य फेरीत त्याच्यासमोर देशवासीय किदांबी श्रीकांतचे मोठे आव्हान असेल.

दोन वेळा ऑलिपिंक पदक विजेत्या २६ वर्षीय सिंधूने ४७ मिनिटे चाललेल्या सामन्यात सुरुवातीचा गेम १७-२१ असा गमावला, परंतु त्यानंतरच्या गेममध्ये तिने दमदार पुनरागमन करत २३ वर्षीय क्लाराची आघाडी मोडीत काढली व गेम २१-७ अशा मोठ्या फरकाने जिंकला. अखेरच्या तिसऱ्या गेममध्ये जागतिक क्रमवारीत ५६ स्थानावर असणाऱ्या क्लाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र सिंधूने आपला अनुभव पणाला लावत २१-१२ अशा फरकाने जिंकला. सिंधूची लढत आता तुर्कस्तानच्या नेस्लिहान यिगितशी होईल जिने मरिना युलिनाचा २१-१८,२१-१३ असा पराभव केला आहे.

श्रीकांतचीही सुरुवात खराब झाली. पहिल्या गेममध्ये जोनाटनने १३-२१ असे गुण मिळवत सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतरच्या दोन्ही गेम्समध्ये मात्र श्रीकांतने पुनरागमन करीत २१-१८, २१-१५ अशी विजयी आघाडी घेतली. भारताच्या लक्ष्य सेनला जपानच्या के. मोमोटोकडून १३-२१, १९-२१ असे पराभूत व्हावे लागले; तर ध्रुव कपिला व एन. सिक्की रेड्डी या मिश्र जोडीलाही १५-२१, २३-२१, १८-२१ अशा फरकाने निराशेचा सामना करावा लागला. अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी या जोडीला जोंग कितीथाराकुल- रविंदा प्राजोंगजई या जोडीकडून २१-१८, २१-१२ अशा फरकाने हार सहन करावी लागली.

loading image
go to top